रतन यांच्या 'टाटा' नंतर राष्ट्रपतीपदासाठी स्वयंसेवकाचा शोध सुरू

 Mumbai
रतन यांच्या 'टाटा' नंतर राष्ट्रपतीपदासाठी स्वयंसेवकाचा शोध सुरू

देशातले अग्रगण्य उद्योगपती रतन टाटा यांचं नाव राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत मागे पडलं आहे. भारताचे राष्ट्रपती म्हणून रतन टाटा यांनी विराजमान व्हावं, यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आजही अनुकूल आहेत. मात्र, टाटा यांची गेल्या काही महिन्यांत ढासळलेली प्रकृती लक्षात घेता ते इतकी मोठी जबाबदारी स्वीकारतील का? या बाबतीत संदिग्धता आहे.

 टाटा यांची संभाव्य माघार गृहित धरुन भारतीय जनता पार्टीनं याबाबतीत पुढची रणनीती आखायला सुरुवात केली आहे. रतन टाटा नाहीत तर राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारासाठी पर्याय म्हणून पुढे केलेलं नाव स्वयंसेवकाचं किंवा महिलेचं असावं, याबाबत संघ आणि भाजपा धुरिणांमध्ये एकमत होताना दिसत आहे. ‘सेफगेम’ म्हणून विविध पर्याय पाडताळून पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपाचे ज्येष्ठ नेतामंडळी तयार आहेत. 

भाजपामध्ये ‘पितामहा’च्या भूमिकेत शिरलेल्या लालकृष्ण आडवाणी यांचं आजही राष्ट्रपतीपदासाठीचं स्वप्नरंजन कायम आहे. आडवाणी यांच्या नावाला भाजपाच्या घटकपक्षांमध्ये सहमती नाही. तसंच अयोध्येतील वादग्रस्त वास्तू पाडल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं त्यांच्याविरोधात खटला दाखल होऊ शकतो, याचे संकेत देशाच्या सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. भाजपा आणि संघ आडवाणी यांच्यासाठी एवढा मोठा जुगार खेळणार नाहीत. राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन यांचं नाव आघाडीवर आहे. 

सूत्रांच्या माहितीनुसार, सोमवारी नवी दिल्लीत झालेल्या नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स (एनडीए)च्या स्नेहभोजन कम बैठकीत एनडीएच्या वतीनं राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून लालकृष्ण आडवाणी, सुमित्रा महाजन यांच्यासह केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, केंद्रीय समाजकल्याणमंत्री थावरचंद गेहलोत, ओडिशाच्या राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांची नावांवरसुद्धा चर्चा झाली. स्वयंसेवक किंवा महिला हे संघाचे निकष भाजपाला मान्य करावे लागणार, हे निश्चित.

हे पण वाचा - रतन टाटा राष्ट्रपतीपदाचे उमेदवार?

देशाच्या राजकारणात मुरलेले शरद पवार हेसुद्धा आपली ‘पॉवर’ वापरण्याची शक्यता आहे. निदान आजघडीला शरद पवार राष्ट्रपतीपदाच्या स्पर्धेबाहेर मानले जातात. अर्थात, एनडीएतल्या घटकपक्षांमध्ये कुणाच्या नावाबाबत एकमत होतं, यावरसुद्धा बरंच काही अवलंबून आहे. एकूण रतन टाटा यांनी राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीला ‘टाटा’ केल्यास उद्भवणा-या परिस्थितीतून मार्ग काढताना भाजपाला ‘दक्ष’ रहावं लागणार आहे.Loading Comments