जीएसटी मंजूर होणे ही काँग्रेसचीच उपलब्धी - राधाकृष्ण विखे पाटील

 Mumbai
जीएसटी मंजूर होणे ही काँग्रेसचीच उपलब्धी - राधाकृष्ण विखे पाटील

महाराष्ट्र विधानसभेसह देशभरात जीएसटीला मिळालेली मंजुरी ही काँग्रेसचीच उपलब्धी असल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोमवारी सांगत श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. 

या विधेयकाला विधानसभेत मंजुरी मिळाल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, केंद्रातील काँग्रेस आघाडी सरकारने जीएसटी विधेयक मांडले तेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री असलेले नरेंद्र मोदी यांनी या विधेयकाला विरोध केला होता. कोणत्याही परिस्थितीत हे विधेयक पारित होऊ देणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला होता. परंतु आज त्यांच्याच सरकारने जीएसटी विधेयक पारीत करून घेतले. त्यामुळे देशात जीएसटी लागू होणे, ही भाजपची नव्हे तर काँग्रेसचीच उपलब्धी आहे, असे सांगत याचे श्रेय काँग्रेसचे असल्याचे त्यांनी म्हटले. जीएसटीसाठी महाराष्ट्र विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनात शेतकरी कर्जमाफीची घोषणा झाली नाही, ही दुःखाची बाब आहे. परंतु, कर्जमाफीसाठी विरोधी पक्षाचा लढा सुरूच राहणार आहे. विरोधी पक्षांच्या संघर्ष यात्रेमुळे सरकारवर दबाव निर्माण झाला असून, पुढील काळात आम्ही अधिक आक्रमकपणे ही मागणी लावून धरू असेही राधाकृष्ण विखे पाटील यावेळी म्हणाले.

Loading Comments