अधिकृत उमेदवारांना बंडखोरांचे आव्हान


SHARE

मुंबई - बंडखोरी होईल म्हणून उमेदवारी यादी जाहीर न करता थेट ए/ बी फॉर्मचे वाटप करणाऱ्या पक्षांच्या याद्या अखेर सोशल मीडियातून जाहीर झाल्या आणि आपले पत्ते कापले गेले असल्याची माहिती इच्छुक उमेदवारांना मिळाली. त्यामुळे आपला पत्ता कापणाऱ्या उमेदवाराला आणि पक्षाला धडा शिकवण्यासाठी चक्क बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यामुळे अधिकृत उमेदवारांपुढे बंडखोर उमेदवारांचे मोठे आव्हान आहे.

युवासेनेचा कोषाध्यक्ष अमेय घोले आणि शिवसेनेच्या नगरसेविका किशोरी पेडणेकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे शिवसैनिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती. मात्र,  शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी बंडखोरांनी अन्य पक्षात प्रवेश न करता अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरत पक्षाच्या उमेद्वारांवरच्या तोंडात फेस आणला. दादर-माहीममधील आमदार सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकर यांना प्रभाग 194 मधून उमेदवारी दिल्यामुळे शाखाप्रमुख महेश सावंत आणि माजी शाखाप्रमुख सुनील पावसकर यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरले आहेत. माजी महापौर श्रद्धा जाधव यांच्या विरोधात त्यांच्याच पक्षाच्या साधना राऊळसह अन्य इच्छुकांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे.
जोगेश्वरीतील शिवसेनेचे आमदार मंत्री रवींद्र वायकर यांनी उमेदवारी कापल्यामुळे माजी नगरसेवक शैलेश परब यांनी बाळा नर यांच्या विरोधात प्रभाग 77 मधून अपक्ष म्हणून अर्ज भरला. त्याबरोबर पदाधिकारी ज्ञानेश्वर सावंत यांनी ही पक्षाचे अधिकृत उमेदवार नर यांच्या विरोधात दंड थोपटले आहे. 
माहीममधील प्रभाग 190 मध्ये माजी उपविभागप्रमुख राजू पाटणकर यांची पत्नी वैशाली पाटणकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे इच्छुक उमेदवार महिला शाखाप्रमुख रोहिता ठाकूर यांनी अपक्ष उमेदवारी भरत पाटणकर आणि शिवसेनेलाच आव्हान दिले आहे. तर मुलूंडमधील प्रभाग 106 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आणि विद्यमान नगरसेवक नंदू वैती विरोधातच त्यांच्या पक्षाचे अभिजित चव्हाण यांनी बंड करत अर्ज भरला आहे. वरळीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात त्यांच्याच पक्षाच्या माजी नगरसेविका अनिता नायर यांनी अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज भरला.

संबंधित विषय
ताज्या बातम्या