Advertisement

४५ दिवस उलटूनही घरकामगार, रिक्षा चालकांना पॅकेज नाही- चंद्रकांत पाटील

महाविकास आघाडी सरकारने १,५०० रुपयांचं पॅकेज जाहीर करून ४५ दिवस उलटले तरी अजूनही पॅकेजचा पत्ता नाही, अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केली.

४५ दिवस उलटूनही घरकामगार, रिक्षा चालकांना पॅकेज नाही- चंद्रकांत पाटील
SHARES

कोरोना (coronavirus) प्रतिबंधासाठी लॉकडाऊन लावत असताना महाराष्ट्रातील हातावर पोट असणाऱ्या २० समाजघटकांच्या भूकेचाही विचार करावा, असं मी म्हणालो होतो. मात्र महाविकास आघाडी सरकारने १,५०० रुपयांचं पॅकेज जाहीर करून ४५ दिवस उलटले तरी अजूनही पॅकेजचा पत्ता नाही, अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केली.

यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं की, लाॅकडाऊन लागू करण्याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी एक सर्वपक्षीय बैठक घेतली होती. त्यावेळी कोरोना की भूक असे दोन मुख्य मुद्दे चर्चेत होते. खरं म्हणजे दोन्ही मुद्द्यांना एकाच वेळी महत्त्व देण्याची गरज असल्याने लाॅकडाऊन लागू करताना भुकेचाही विचार करा, असं आमचा आग्रह होता. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार उदार झाले आणि समाजातील जे २० घटक आहेत, ज्यांनी दिवसभर काम केलं नाही की त्यांचं पोट भरणार नाही, अशा घटकांमधून ४ घटकांना १५०० रुपयांचं पॅकेज जाहीर केलं. आधी हे घटक १२ होते, म्हणूनच त्यांना बारा बलुतेदार असं म्हटलं जायचं. पण त्यात काळाच्या ओघात अनेकांचा समावेश झाला. उदा. रिक्षा चालक, घर कामगार करणारे हे घटक पूर्वी नव्हते. 

हेही वाचा- मराठा आरक्षणावर अधिवेशन बोलवण्याची सरकारमध्ये हिंमत नाही- चंद्रकांत पाटील

या घटकांसाठी पॅकेज जाहीर करुनही अजूनपर्यंत मिळालेलं नाही. साधारणत: लाॅकडाऊनच्या मध्ये पॅकेज देताना कल्पना काय असते? तर पुढचे १५ दिवस सर्वकाही बंद आहे, त्यामुळे या दिवसांसाठी हे पॅकेज तुम्ही वापरा.. पण आता ४५ दिवस उलटले. त्यात तीन लाॅकडाऊन झाले, तरीही कशाचा कशाला पत्ता नाही. त्यामुळे आम्ही आमच्या वतीने काही प्रयोग करतोय, ज्यांत आम्ही आमच्या सगळ्या नगरसेवकांकडे आग्रह धरला आहे. पहिल्या कोरोनाच्या लाटेत आम्ही घरोघरी ४ लाखांच्या वर कोरोना किट वाटल्या होत्या. दुसऱ्या कोरोनाच्या वेळेस दोन वेळच्या जेवणाची टंचाई थोडी कमी जाणवली, परंतु ती आता जाणवायला लागली आहे, असं चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी सांगितलं.

सर्वकाही सामान्य होत असल्याने रिक्षा आता रस्त्यावर येतील. पण रिक्षा चालकांकडे गॅस भरायलाही पैसे नाहीत. त्यामुळे माझ्या मतदारसंघात रिक्षा चालकांना २०० रुपयांच्या गॅसचे कुपन्स वाटण्यात येणार आहेत. जेणेकरून धंदा करायला निघालेल्या रिक्षा चालकांना कुठलीही अडचण न येता धंदा करता येईल आणि हातात पुढचे पैसे देखील तयार होतील. शिवाय रिक्षा चालक आणि इतर घटकांतील १२०० जणांचं आम्ही मोफत लसीकरण करणार आहोत, अशी माहिती देखील चंद्रकांत पाटील यांनी दिली.

(rickshaw driver waiting for relief package from maharashtra government says chandrakant patil)


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा