Advertisement

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदासाठी अहिर विरूद्ध पावसकर


राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदासाठी अहिर विरूद्ध पावसकर
SHARES

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अंतर्गत निवडणुकीची प्रक्रिया सुरु असून प्रदेशाध्यक्षपदासाठी जयंत पाटील यांची निवड झाल्यानंतर आता मुंबई अध्यक्षपदाच्या निवडीचे वेध लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांची फेरनिवड होण्याची दाट शक्यता आहे. परंतु, अहिर यांचा पत्ता कापून शिवसेनेतून आयात झालेले किरण पावसकर यांनी आपली वर्णी लावण्यासाठी फिल्डींग लावली आहे. पक्षाचे उपाध्यक्ष नबाव मलिक यांच्या मदतीने पावसकर यांनीही फिल्डींग लावली आहे. त्यामुळे अहिर विरुद्ध पावसकर समर्थकांमध्ये चांगलीच जुंपणार आहे.


दिलीप वळसे पाटलांच्या नेतृत्वाखाली प्रक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षांतर्गत निवडणुका घेतल्या जात आहेत. विद्यमान प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी निवड झाल्यानंतर या रिक्तपदी जयंत पाटील यांची निवड झाली आहे. प्रदेशाध्यक्षपदाची निवड झाल्यानंतर आता मुंबई अध्यक्षांसह शहर अध्यक्षांची निवड केली जाणार आहे. यासाठी दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया सुरु असून मुंबईतील सर्व भागांमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना बोलावून त्यांनी सर्वांची मते जाणून घेतली आहेत.



नवाब मलिकांचा किरण पावसकरांना सपोर्ट

मात्र, या बैठकीत काही मोजक्या गटांनी मुंबई अध्यक्ष म्हणून किरण पावसकर यांचे नाव पुढे रेटले. तर बहुतांशी नगरसेवक, पदाधिकारी यांनी सचिन अहिर यांच्या नावालाच पसंती दिली आहे. नवाब मलिक यांच्या समर्थकांनीच किरण पावसकर यांच्या नावाची शिफारस केल्याची माहिती मिळत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पक्षाचे उपाध्यक्ष नबाव मलिक आणि सचिन अहिर यांचे सूत जुळत नसल्याने मलिक यांनी किरण पावसकर यांच्या नावाची शिफारस केल्याचे समजते.


सचिन अहिरांचं पारडं जड

मात्र, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सचिन अहिर यांचे पारडे जड असून मुंबई अध्यक्ष म्हणून तेच पुन्हा या पक्षाला चांगल्या प्रकारे उभारी देत असल्याचे सांगितले जाते. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ९ नगरसेवक निवडून आले आहेत. मागील महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे १३ नगरसेवक निवडून आले होते. परंतु यावेळी अत्यंत प्रतिकूल अवस्थेतही मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी निवडीसह प्रचाराची योग्य रणनिती आखल्याने किमान पक्षाचे ९ नगरसेवक निवडून आले, असे बोलले जाते.



हेही वाचा

हवाई प्रवासाचा मुख्यमंत्र्यांचा वर्षाकाठी ६ कोटींचा खर्च


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा