राज्यसभेची निवडणूक लढवणार असल्याची घोषणा संभाजीराजे छत्रपती यांनी केली. ही निवडणूक अपक्ष म्हणून लढवणार असल्याचेही संभाजीराजेंनी सांगितले. तसेच 'स्वराज्य' संघटनेची स्थापना करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली आहे.
ते म्हणाले की, लवकरच मी महाराष्ट्राचा दौरा करणार आहे. लोकांना स्वराज्याच्या नावाखाली एकत्र करण्यासाठी दौरा करणार आहे. जनतेला एका छताखाली कसे आणता येईल यासाठी प्रयत्न करणार. जिथे अन्याय होतो तिथे लढा देणार आहे. शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांचे विचार पोहोचवण्यासाठी ही संघटना स्थापन करणार आहे.”
पहिला टप्पा स्वराज्य संघटीत करणे हा आहे. त्यानंतर पुढील निर्णय घेणार आहे. ही संघटना, हे स्वराज्य उद्या राजकीय पक्ष झाला तरी वावगे ठरु नये. त्याला माझी तयारी आहे. पण पहिला टप्प्यात संघटीत होणे गरजेचे आहे. या महिन्यातच महाराष्ट्राच्या दौऱ्याला सुरुवात करणार असल्याचे संभाजीराजे म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावून विनंती केली की आपण राष्ट्रपती नियुक्त खासदार व्हावे. म्हणून 2016 ला मी पद स्वीकारल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले. त्या दोघांचेही संभाजीराजेंनी यावेळी आभार मानले. छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांच्या विचारांवर माझी पुढील वाटचाल असणार आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
हेही वाचा