Advertisement

“ज्या हातांनी मनसैनिकांना मारलं, त्याच हातांनी..”, मनसेचा इशारा

मनसैनिकांवर हात उगारणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचं तातडीने निलंबन करा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस आणि प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी केली आहे.

“ज्या हातांनी मनसैनिकांना मारलं, त्याच हातांनी..”, मनसेचा इशारा
SHARES

वसईतील एका कार्यक्रमात “आयुक्त साहेब वेळ द्या”, अशी मागणी करत घोषणाबाजी करणाऱ्या मनसैनिकांना स्थानिक पोलिसांनी शिवीगाळ करत त्यांच्यावर हात उचलल्याची  घटना नुकतीच घडली. या घटनेवर संताप व्यक्त करत मनसैनिकांवर हात उगारणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचं तातडीने निलंबन करा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (mns) सरचिटणीस आणि प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी केली आहे. सोबत कायद्याचं पालन करण्याचा इशारा देखील दिला आहे.

परिवहन सेवेच्या उद्घाटनासाठी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे नुकतेच वसईत आले होते. या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी “आयुक्त साहेब वेळ द्या” अशी घोषणाबाजी केली. त्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना बाहेर काढताना त्यांना शिवीगाळ आणि मारहाण केली. तसंच दोन कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतलं होतं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच पोलिसांच्या दंडुकाशाहीवर संताप व्यक्त होत आहे. 

पोलिसांच्या या बेजबाबदार वागणुकीची दखल घेत मनसे नेते संदीप देशपांडे (sandeep deshpande) यांनी देखील एक व्हिडिओ जारी करत पोलिसांना जाहीर आव्हान दिलं आहे. आपल्या व्हिडिओत ते म्हणतात, वसई-विरार येथील कार्यक्रमाचा एक व्हिडिओ माझ्या पाहण्यात आला. या कार्यक्रमात आमचे दोन महाराष्ट्र सैनिक आयुक्त भेट देत नसल्याने त्यांनी आम्हाला वेळ द्यावी, या मागणीसाठी आंदोलन करत होते. त्यानंतर त्यांच्यावर हात उचलणारे पोलिसही आम्ही बघितले. हे पोलीस आमच्या महाराष्ट्र सैनिकांना आई-बहिणीवरून शिव्या देत होते. 

हेही वाचा- गुजराती माणसाने उद्धव ठाकरेंना ‘आपडा’ म्हटल्यावर तुमचा तीळपापडा का झाला?


या पोलिसांना आम्हाला एकच सांगायचं आहे की, आमच्या महाराष्ट्र सैनिकाच्या आई-बहिणी रस्त्यावर पडलेल्या नाहीत. सरकारचे दलाल असल्यासारखं पोलिसांनी वागू नये. सत्ता येते आणि जाते. पोलिसांनी पोलिसांसारखं काम केलं पाहिजे. त्या ठिकाणी पोलिसांनी बळाचा वापर केला आणि कार्यकर्त्यांना कानाखाली लगावली. त्याचीही गरज नव्हती. तुम्ही त्यांना हाताला धरून नेत असताना ते तुमच्यासोबत आले, गाडीतही बसले. महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिंदाबाद अशी घोषणा दिल्यावर पोलिसांनी त्याला कानाखाली मारून शिवीगाळ केली. एवढा माज दाखवू नये आणि पोलिसांनी सत्तेची दलाली करू नये. एवढीच हिंमत असेल तर दोन तास तुमची वर्दी बाजूला ठेवा आणि आमच्याशी वन बाय वन भिडा. तेव्हा आम्ही दाखवतो की महाराष्ट्र सैनिक राज ठाकरेंचा (raj thackeray) कट्टर सैनिक काय असतो.

जेव्हा तुमच्यावर हल्ला झाला तेव्हा तुमच्या संरक्षणासाठी आम्ही सर्वांनी मिळून आझाद मैदानावर मोर्चा काढला. पोलिसांवर हात उचलू नये अशी राजसाहेबांची आम्हाला शिकवण आहे म्हणून आम्ही या गोष्टी सहन करत आहोत. याचा अर्थ आम्ही प्रत्येक गोष्टी सहन करू असा होत नाही. ज्या पोलिसांनी हात उचलला आणि शिवीगाळ केला त्यांना तातडीनं निलंबित करावं अशी आमची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून मागणी आहे. एवढंच नाही, तर ज्या हातांनी महाराष्ट्र सैनिकांना मारलंत त्याच हातांनी सलाम करायला लावू !!, असंही संदीप देशपांडे म्हणाले.

(sandeep deshpande demands to suspend police officer who beaten up mns party workers at vasai)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा