Advertisement

समित्यांच्या बैठकांमध्ये शिवसेना-भाजपात होणार नडानडी


समित्यांच्या बैठकांमध्ये शिवसेना-भाजपात होणार नडानडी
SHARES

मुंबई - मुंबई महपालिकेच्या निवडणुकीत जनतेने कुणालाही स्पष्ट बहुमत दिले नाही. मात्र, विद्यमान महापालिकेतील नगरसेवकांच्या तुलनेत भाजपाचे तब्बल 51 नगरसेवक वाढले आहेत. परंतु या वाढलेल्या नगरसेवक संख्येमुळे शिवसेनेची डोकेदुखी वाढलेली आहे. यामुळे समित्यांमधील सदस्य संख्येत शिवसेनेच्या बरोबरीत भाजपा जाऊन बसली आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांची युती न झाल्यास समित्यांच्या बैठकीत प्रस्ताव मंजुरीच्यावेळी दोन्ही पक्षांच्या सदस्यांमध्ये नडानडीच होणार आहे.

महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेचे 84 तर भाजपाचे 82 नगरसेवक निवडून आले आहेत. दोन्ही पक्षांना ऐंशीतच रोखले. मात्र, शिवसेनेच्या सदस्यसंख्येत 9 ने वाढ झाली आहे. तर त्या तुलनेत भाजपाची संख्या 51 ने वाढली आहे. त्यामुळे स्थायी समितीत भाजपाची सदस्य संख्या आता वाढलेली पाहायला मिळणार आहे. स्थायी समिती शिवसेनेचे दहा तर भाजपाचे नऊ सदस्य जाणार आहेत. विद्यमान महापालिकेतील स्थायी समितीत शिवसेनेचे 9 तर भाजपाचे 4 सदस्य आहेत. परंतु नव्या महापालिकेत शिवसेनेचा केवळ एक सदस्य वाढत असून भाजपाचे पाच सदस्य वाढत आहेत. ही स्थिती सुधार समितीच्या बैठकीत आहे. याठिकाणीही शिवसेनेचे 10 तर भाजपाचे 9 सदस्य असणार आहेत. त्यामुळे भविष्यात या दोन्ही पक्षांमध्ये युती न झाल्यास स्थायी समिती आणि सुधार समितीच्या बैठकीत सदस्यांमध्ये नडानडी होणार आहे.

भाजपा विरोधी पक्षात बसल्यास एरव्ही बहुमताच्या आधारे प्रस्ताव मंजुर करणाऱ्या शिवसेनेला ते रोखू शकतात. त्यामुळे स्थायी आणि सुधार समितीत आता प्रत्येक प्रस्तावावर चर्चा आणि विरोधाचा सूर पाहायला मिळणार आहे.

बेस्ट आणि शिक्षण समितीत होणार राडेबाजीच

बेस्ट समिती आणि शिक्षण समितीच्या बैठकीत शिवसेना आणि भाजपाचे प्रत्येकी अनुक्रमे 6 आणि 8 सदस्य जाणार आहे. त्यामुळे या दोन्ही समित्यांच्या बैठकींमध्ये दोन्ही पक्षांच्या सदस्यांमध्ये चांगलीच जुंपलेली पाहायला मिळणार आहे.

भाजपाचे यंदा होणार दोन स्वीकृत सदस्य

मुंबई महापालिकेत पाच नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती होणार असून यामध्ये यावेळी शिवसेना आणि भाजपाच्या वाट्याला प्रत्येकी दोन तर काँग्रेसच्या वाट्याला एक जागा मिळणार आहे. निवडून आलेल्या सदस्य संख्येनुसार नामनिर्देत सदस्यांचा राखीव कोटा निर्माण झाला आहे. सध्या काँग्रेसचे दोन, शिवसेनेचे दोन आणि भाजपाचा एक या प्रकारे नामनिर्देशित सदस्य आहेत. परंतु काँग्रेसच्या नगरसेवकांची संख्या कमी झाल्यामुळे त्यांचा यावेळी केवळ एकच सदस्य नामनिर्देशित म्हणून नियुक्त होईल.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा