Advertisement

भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस जयवंत परब यांचं निधन

शिवसेनेचे माजी नगरसेवक, भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस जयवंत परब यांचं शनिवारी सायंकाळी लीलावती रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झालं. ते ७० वर्षांचे होते.

भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस जयवंत परब यांचं निधन
SHARES

शिवसेनेचे माजी नगरसेवक, भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस जयवंत परब यांचं शनिवारी सायंकाळी लीलावती रुग्णालयात दीर्घ आजाराने  निधन झालं. ते ७० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, जावई, नात तसंच दोन भाऊ असा परिवार आहे.

मागील ४ महिन्यांपासून जयवंत परब यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू होते. जयवंत परब यांना मधुमेह आणि किडनी विकाराचा त्रास असल्याने त्यांची प्रकृती उत्तोरोत्तर खालावतच गेली. त्यातच त्यांचं निधन झालं. जयवंत परब यांच्या पार्थिवावर अंधेरीतील आंबोली स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जयवंत परब यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं. जयवंत परब हे तसे कडवट शिवसैनिक. कामगार क्षेत्रात शिवसेनेचा लढाऊ बाणा त्यांनी जपला. प्रकृती बरी नसतानाही ते अनेक वर्षे कामगार सेनेची जबाबदारी पार पाडत होते, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

अंधेरी विभागातून शिवसेनेचे नगरसेवक म्हणून ते निवडून आले होते. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार पंचतारांकित हॉटेलांत भारतीय कामगार सेनेची युनियन अधिक बळकट करण्यात जयवंत परब यांचा मोलाचा वाटा होता. अनेक मराठी तरूणांना या युनियनच्या माध्यमातून त्यांनी नोकऱ्या मिळवून दिल्या. त्याच जोडीला त्यांनी समर्थ सहकारी पतपेढी सुरू करून मराठी तरूणांचा आर्थिक पाया मजबूत करण्याचाही यशस्वी प्रयत्न केला. अंधेरी, मसुरा इथं या पतपेढीच्या शाखा अजूनही सुरू आहेत. मालवणमधील मसुरा या ठिकाणी त्यांनी भरतगड इंग्लिश मीडियम स्कूल नावाची शाळा सुरू केली. 

जयवंत परब काही काळ काँग्रेसमध्ये देखील गेले होते. एकेकाळी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे समर्थक असलेल्या परब यांनी २००५ मध्ये त्यांच्यासोबतच शिवसेना सोडली होती. त्यानंतर ते काँग्रेसमध्ये गेले. त्यानंतर २०११ मध्ये ते पुन्हा शिवसेनेत परतले होते.  


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा