Advertisement

'रावा'स पुढे करून कामगारांस 'रंक' करण्याचा डाव-सामानातून शशांक राव-भाजपावर टीका


'रावा'स पुढे करून कामगारांस 'रंक' करण्याचा डाव-सामानातून शशांक राव-भाजपावर टीका
SHARES

तब्बल ९ दिवसांनंतर बेस्ट संप १६ जानेवारीपाला मिटला असून आता बेस्ट वाहतुक सुरळीत धावू लागली आहे. मात्र या बेस्ट संपावरून सुरू असलेलं राजकारण काही थांबताना दिसत नाही. बेस्ट संपावरून शिवसेना आणि कामगार नेते शशांक राव यांच्यात चांगलीच जुंपली आहे. शिवसेनेच्या नेत्यांकडून शशांक राव यांच्यावर आरोप आणि टीका होत असतानाच आता थेट सामनामधूनही शशांक राव यांच्यावर शिवसेनेनं टीकेचा बाण सोडला आहे. बेस्ट संपाच्या नावावर 'रावा'स पुढं करत बेस्ट कामगारांना रंक करण्याचा डाव होता आणि या डावामागे भाजपाचे हात होते असा आरोप पुन्हा एकदा शिवसेनेनं शनिवारच्या सामनाच्या अग्रलेखातून केला आहे.


९ दिवसांचा संप

बेस्ट संपाच्या पहिल्याच दिवशी शिवसेनेच्या कामगार सेनेनं संपातून माघार घेतली. पण कामगार सेनेतील कामगारांनी संपावर ठाम राहण्याची भूमिका घेतल्यानं कामगार सेना तोंडघशी पडली. संप सुरूच राहिला आणि तब्बल ९ दिवसांनंतर संप मिटला आणि तोही सर्वोच्च न्यायालयाने मध्यस्थीची नेमणूक केल्यानंतर. संप मिटला, प्रवाशांनी सुटकेचा श्वास घेतला. पण त्यानंतर शशांक राव आणि शिवसेनेत सामना रंगला आहे. शिवसेनेचे आमदार अॅड. अनिल परब यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत बेस्टचा संप लांबवण्यामागे शिवसेनेला बदनाम करण्याचा डाव होता आणि त्यामुळे नारायण राणे, कपिलप पाटील यांच्यासह भाजपाचा अदृश्य हात होता असा आरोप केला. या आरोपानंतर शशांक राव यांनीही शिवसेनेला सडेतोड उत्तर देत संपात शिवसेना तोंडघशी पडल्याचं म्हटलं आहे.


भाजपानं तेल ओतलं-सेनेचा आरोप

आता शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातूनही शशांक राव यांच्यावर टिका केली आहे. राव आणि रंक नावाच्या अग्रलेखातून शिवसेनेनं बेस्ट उपक्रम तोट्यात का जात आहे याची कारण सांगत एका रावासाठी कामगारांना रंक करायचा का असा सवाल केला आहे. तर या संपात तेल ओतण्याचं काम भाजपानं केलं आणि कामगारांना शिवसेनेच्या नावानं शिमगा करायला लावला असा घणाघाती आरोपही शिवसेनेनं या अग्रलेखातून केला आहे. तर पगारात ७ हजार रूपयांची वाढ झाल्याचं सांगत शशांक राव कामगारांची फसवणूक करत असल्याचं म्हणताच संपातील एकाही कामगाराची नोकरी जाऊ देणार नाही हे शिवसेनेचं वचन असल्याचंही अग्रलेखात नमुद करण्यात आलं आहे.


केंद्रावर टीका

मराठी माणूस, श्रमिक जगला पाहिजे हीच शिवसेनेची भूमिका आहे. त्यामुळे कामगारांच्या मनात कितीही विष कालवण्याचा प्रयत्न झाला तरी तो प्रयत्न फोलच ठरणार आहे असंही अग्रलेखात म्हटलं आहे. तर केंद्र सरकारवर, पंतप्रधान नरेंद्र मोदीवरही हल्लाबोल केला आहे. बुलेट ट्रेनसाठी, भाजपाच्या जाहिरातींसाठी कोट्यवधींची उधळपट्टी केली जात आहे, मात्र त्याचवेळी आर्थिक अडचणीत अडकलेल्या बेस्टला मदत करताना हात आखडता घेतला जात असल्याचाही आरोप शिवसेनेनं केला आहे. तर अग्रलेखाच्या शेवटी केंद्र सरकारच्या धोरणाप्रमाणे खासगीकरण करून विषय संपवायचा की आहे ते टिकवून मराठी माणसांच्या नोकऱ्या वाचवायच्या याचं उत्तर फुकटची रावगिरी करणार्यांनी आणि त्या रावांचे पडद्यामागून सूत्रसंचालन करणार्यांनी द्यावं. जनता रंक आणि खाक झाली तरी चालले, पण नेत्यांची रावगिरी चालत राहिले पाहिजे आम्ही या विचारांचे नव्हतो. त्यामुळे ज्यांना बोंबलायचे, त्यांनी खुशाल बोंबलावे असंही म्हटलं आहे.



हेही वाचा -

200 हून अधिक नागरीकांची फसवणूक करणारे पोस्ट एजंट अटकेत

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या ९ दिवसांच्या पगाराला कात्री?



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा