बेस्ट कर्मचाऱ्यांच्या ९ दिवसांच्या पगाराला कात्री?


SHARE

तब्बल ९ दिवसांच्या संप करत आपल्या न्याय हक्काचा लढा यशस्वी करणाऱ्या बेस्ट कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही असं आश्वासन बेस्ट प्रशासनानं उच्च न्यायालयात दिलं आहे. पण असं असलं तरी आता संपात सहभागी झालेल्या ३० हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांच्या ९ दिवसांच्या पगाराला आता कात्री लागणार आहे. कारण बेस्ट प्रशासनानं आता ९ दिवसांमध्ये झालेलं आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी कर्मचाऱ्यांचा ९ दिवसांचा पगार कापण्याचा निर्णय घेतला आहे. तशा हालचाली प्रशासनाकडून सुरू झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे संप यशस्वी झाला असला तरी कर्मचाऱ्यांना ९ दिवसांच्या पगारावर पाणी सोडावं लागणार आहे.


२७ कोटींचं नुकसान

गेल्या कित्येक वर्षांपासून बेस्ट मोठ्या आर्थिक संकटात अडकलेली आहे. बेस्टचा दररोजचा खर्च अंदाजे ६ कोटी असून बेस्टला दररोज अंदाजे ३ कोटींचं उत्पन्न मिळतं. त्यामुळे बेस्टवरील आर्थिक भार वाढतच चालला आहे. अशात बेस्ट कर्मचाऱ्यांनी तब्बल नऊ दिवस संप केल्यानं बेस्टचं ९ दिवसांमध्ये २७ कोटींच नुकसान झालं आहे. त्यामुळे आता हे नुकसान कसं भरून काढायचं हाच प्रश्न बेस्टसमोर उभा ठाकला आहे.


नुकसान असं भरून काढणार

यातून मार्ग काढण्यासाठी आता बेस्टनं थेट संपकरी कर्मचाऱ्यांच्या ९ दिवसांच्या पगारावर गदा आणण्याचा निर्णय घेतला आहे. संप काळात गैरहजर असलेल्या कर्मचाऱ्यांचा ९ दिवसांचा पगार कापला जाणार आहे. दरम्यान यासंबंधी माहिती घेण्यासाठी बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांच्याशी संपर्क साधला, पण त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. तर बेस्ट समिती सदस्य आणि बेस्ट कृती समिती निमंत्रक शशांक राव यांच्याशीही संपर्क होऊ शकलेला नाही. त्यामुळे बेस्टच्या या निर्णयावर आता कर्मचाऱ्यांची नेमकी काय भूमिका असेल हे अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र बेस्टच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमधून संताप व्यक्त होण्याची आणि त्यातून वाद होण्याचीही शक्यता व्यक्त होत आहे.हेही वाचा -

छम छम बंदच? सरकार डान्स बार बंदीसाठी अध्यादेश काढण्याच्या तयारीत

बेस्ट पासधारकांसाठी गूडन्यूज! ९ दिवसांची मिळणार भरपाईसंबंधित विषय
ताज्या बातम्या