Advertisement

नालेसफाईच्या आरोपांचे सत्ताधाऱ्यांकडून अप्रत्यक्ष समर्थन


नालेसफाईच्या आरोपांचे सत्ताधाऱ्यांकडून अप्रत्यक्ष समर्थन
SHARES

मुंबईतील नालेसफाईची कामे अजूनही अर्धवटच आहेत. प्रशासन खोटी आकडेवारी सादर करून मुंबईकरांची फसवणूक करत असल्याचा आरोप करत तसेच महापालिका आपत्कालीन व्यवस्थापन कक्षात मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांना नाकारलेल्या प्रवेशाचा तीव्र निषेध करत मंगळवारी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी स्थायी समितीच्या बैठकीत झटपट सभा तहकुबी मांडली. मात्र, नालेसफाईच्या मुद्द्यावरून काँग्रेसने शिवसेना आणि भाजपाला टिकेचे लक्ष्य केलेले असतानाही या दोन्ही पक्षांनी काँग्रेसच्या मुद्द्याला विरोध केला नाही. एवढेच नव्हे, तर सभागृह नेत्यांनी विरोध करण्याऐवजी त्यावर केवळ मत नोंदवल्यामुळे अखेर ही सभा तहकुबी स्थायी समिती अध्यक्षांना मंजूर करावी लागली. त्यामुळे काँग्रेसने खेळलेल्या या खेळीत शिवसेना आणि पर्यायाने भाजपाची विकेट पडली.

80 ते 90 टक्के सफाईचा दावा -

मुंबईतील नाल्यांची सफाई 80 ते 90 टक्के पूर्ण झाल्याचा दावा महापालिका प्रशासन करत आहे. प्रत्यक्षात मात्र मुंबई काँग्रेस अध्यक्षांनी केलेल्या पाहणीत दोन नाले पूर्णपणे कचऱ्याने भरलेले पाहायला मिळाले. या नाल्यातील गाळ अद्यापही साफ करण्यात आलेला नाही. तसेच नाल्याच्या काठावर काढून ठेवलेला गाळ 15 ते 20 दिवस उचलला जात नाही, असे आढळून आले. त्यामुळे नालेसफाई झाल्याचे सांगत प्रशासन मुंबईकरांचा विश्वासघात करत आहे. सफाईच्या नावाखाली प्रशासन हातसफाई करत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते रवी राजा केला.

आपत्कालीन कक्षातील प्रवेशाचे निकष काय?   

नाल्यातील गाळ कुठे टाकला जातो, याची माहिती नाही. मात्र, या सर्व पार्श्वभूमीवर मान्सूनपूर्व तयारीसाठी आपत्कालीन व्यवस्थापन कक्ष कशाप्रकारे तयारी करत आहे, याची माहिती घेण्याची इच्छा प्रकट करणारे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांना कक्षात प्रवेश नाकारण्यात आला. त्यामुळे कोणत्या व्यक्तीला प्रवेश द्यायचा आणि कोणाला द्यायचा नाही याची काही मार्गदर्शक धोरणे प्रशासनाने बनवली आहेत का? त्यामुळे पावसासाठी महापालिका प्रशासन सज्ज नसून अपुरी नालेसफाई आणि निरुपम यांचा जाणीवपूर्वक केलेला अपमान यामुळे ही सभा झटपट तहकूब करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

विरोधी पक्षनेत्यांच्या सभा तहकुबीला सपाचे गटनेते रईस शेख यांनी पाठिंबा देत रफिक नाल्याच्या काठावर केवळ गाळ काढून ठेवला जात आहे, पण उचलला जात नसल्यामुळे नागरिक त्रस्त असल्याचे सांगितले. छोट्या नाल्यांची सफाईही योग्य प्रकारे होत नाही. निरुपमजींना प्रवेश नाकारणे ही एकप्रकारे प्रशासनाकडून झालेली चूक असल्याचे त्यांनी म्हटले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव यांनी याचे समर्थन करतानाच विभागातील नाले आजही साफ न होणे ही मुंबईच्या दृष्टीकोनातून भयावह बाब असल्याचे म्हटले आहे. निरुपमजींना कक्षात जाण्यापासून रोखले गेले, पण असे यापूर्वी कोणाला रोखले गेले होते का? मग त्यांनाच का रोखले? असा सवाल करत येत्या 1 जूनपासून मुंबईतील नाल्यांचा पर्दाफाश राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

काँग्रेसचे आसिफ झकेरिया यांनी एकाबाजूला या कक्षात प्रवेश नाकारला जातो आणि विभाग कार्यालयांमधील आपत्कालीन कक्षात चक्क टिव्हीवर क्रिकेट मॅच आणि मालिका पाहिल्या जातात, असे आरोप केले आहेत.

या सभा तहकुबीवर सभागृह नेत्यांनी आपले मत व्यक्त करत नालेसफाईचे काम 95 टक्के पूर्ण झाल्याचा प्रशासनाचा दावा असल्याचे सांगितले. त्यामुळे कुठे त्रास होणार नाही याची काळजी आम्ही घेणार आहोत, असे सांगत मागील वर्षीच्या तुलनेत नालेसफाई योग्य झाल्याचे सांगितले. तसेच निरुपम यांना का प्रवेश दिला नाही याचा खुलासा करण्याची मागणी केली.

मात्र, यावर भाजपाचे मनोज कोटक यांनी नालेसफाईच्या न झालेल्या सफाईच्या आरोपांचे समर्थन करतानाच आम्ही आधीपासून नाल्यांची सफाईच्या कामांवर लक्ष ठेवून आहोत. ज्या त्रुटी दिसतात, ते प्रशासनाला दाखवून देत आहोत. मात्र, निरुपम यांना व्हीआयपी कल्चरमध्ये राहण्याची सवय असल्यामुळे का रोखले याचा खुलासा व्हायला हवे, असे सांगितले.

यावर महापालिका अतिरिक्त आयुक्त आय.ए.कुंदन यांनी नालेसफाईच्या कामाबाबत कोणतेही भाष्य न करता निरुपम यांना प्रवेश नाकारला असला तरी विरोधी पक्षनेत्यांच्या प्रवेशास परवानगी दिली होती. परंतु या कक्षात परवानगी दिल्याशिवाय कोणालाही जाता येणार नाही, असे त्यांनी सांगितले तसेच यापूर्वी ज्यांना प्रवेश दिला होता, त्यांची यादी पुढील बैठकीत सादर करण्यात येईल, असे सांगितले. त्यामुळे या सभा तहकुबीला विरोध न झाल्यामुळे ती स्थायी समिती अध्यक्षांनी मंजूर केली.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा