Advertisement

'दुश्मन का दुश्मन दोस्त'? 'मातोश्री'च्या फोनने भाजपच्या गोटात अस्वस्थता

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि तेलगू देसम पक्षाचे (टीडीपी) नेते चंद्राबाबू नायडू यांच्यात शनिवारी दूरध्वनीवरून चर्चा झाल्याचं कळत आहे. मात्र नेमकी काय चर्चा झाली ते कळू शकलेलं नाही.

'दुश्मन  का दुश्मन दोस्त'? 'मातोश्री'च्या फोनने भाजपच्या गोटात अस्वस्थता
SHARES

वांद्रे, कलानगरमधील मातोश्री निवासस्थान म्हणजे शिवसेनेचा रिमाेट कंट्रोल. या मातोश्रीवरून शनिवारी एक फोन आंध्रपदेशला लावण्यात आला अन् केंद्रीय पातळीवरील भाजपाच्या गोटात अस्वस्थता पसरली. हा फोन होता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा थेट आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना. एका बाजूला स्वबळाची घोषणा केलेली शिवसेना आणि दुसऱ्या बाजूला एनडीएतून बाहेर पडण्याच्या तयारीत असलेल्या तेलगू देसम या दोन्ही पक्षांच्या प्रमुखांमध्ये गुफ्तगू झाल्यानं सहाजिकच चर्चांना उधाण आलं.


'एनडीए'विरोधाचे वारे

२०१९ मध्ये येऊ घातलेली विधानसभा आणि लोकसभा निवडणूक स्वबळावरच लढवण्याची घोषणा शिवसेनेने केल्यानंतर भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी(एनडीए)तील इतर घटकपक्षही भाजपाविरुद्ध मोट बांधण्याच्या तयारीला लागले आहेत. शिवसेनेपाठोपाठ चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसम पक्षातही 'एनडीए'विरोधातील बंडाचे वारे वाहू लागलेत.

'दुश्मन का दुश्मन अपना दोस्त' या समीकरणानुसार सेना आणि टीडीपीत बोलणी सुरु असल्याच्या चर्चाना उधाण आलं आहे. असं झाल्यास आणि मित्रपक्षांनीच साथ सोडल्यास २०१९ च्या निवडणुकांत भाजपाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या भाजपच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे.


उद्धव, चंद्राबाबू नायडू यांच्यात चर्चा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि तेलगू देसम पक्षाचे (टीडीपी) नेते चंद्राबाबू नायडू यांच्यात शनिवारी दूरध्वनीवरून चर्चा झाल्याचं कळत आहे. मात्र नेमकी काय चर्चा झाली ते कळू शकलेलं नाही. दोन्ही पक्षांकडून भाजपविरुद्ध प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात आली आहे, त्यामुळे दोन्ही पक्षांचं सूत जुळण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.


एकत्र आल्यास डोकेदुखी

टीडीपी आणि शिवसेना हे दोन्ही प्रादेशिक पक्ष असले तरी केंद्रात ते भाजपच्या सत्तेत सहभागी असून महत्त्वाची कामगिरी बजावत आहेत. सेनेनं तर वेगळी चूल मांडण्याचा निर्धार केला आहेच; पण चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षातही धुसफूस सुरु आहे. नुकत्याच झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनात टीडीपीच्या वाटायला फार काही न आल्याने भविष्यात भाजपाशी फारकत घेण्याच्या मुद्द्यावर सध्या पक्षात बैठकांचं सत्र सुरु असल्याचं कळत आहे. एवढंच नव्हे, तर शिवसेना आणि टीडीपी हे दोन्ही पक्ष एकत्र आल्यास भाजपची डोकेदुखी वाढणार एवढं नक्की.



हेही वाचा-

शिवसेनेचा भाजपाला दम, २०१९ ची निवडणूक स्वबळावर लढणार

सिंहासन नको, सत्ता हवी! मनसैनिकाच्या भेटवस्तूचा राज यांच्याकडून नम्रपणे नकार


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा