Advertisement

एकच स्पिरीट, नो किरीट; सोमय्यांना शिवसेनेचा आक्रमक विरोध

शिवसैनिकांचा राग दूर करण्यासाठी किरीट सोमय्या यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, मातोश्रीवरून त्यांच्या भेटीला साफ नकार दिल्याचं समजतं.

एकच स्पिरीट, नो किरीट; सोमय्यांना शिवसेनेचा आक्रमक विरोध
SHARES

लोकसभा निवडणूकीसाठी शिवसेना-भाजपाची युती झाली आहे. मात्र, तरीही शिवसैनिकांचा भाजप खासदार किरीट सोमय्या यांच्यावरील राग अजून गेलेला नसल्याचं दिसून येत आहे. सोमय्या यांना निवडणुकीत कोणत्याही प्रकारचं सहकार्य करणार नसल्याचं शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. आता तर सोमय्यांविरोधात शिवसेनेने एकच स्पिरीट, नो किरीट हा नारा दिला आहे. सोमय्यांविरोधात शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. त्यामुळं शिवसैनिकांचा राग दूर करण्यासाठी किरीट सोमय्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, मातोश्रीवरून त्यांच्या भेटीला साफ नकार दिल्याचं समजतं. 


मनधरणीचा प्रयत्न

शिवसैनिकांचा राग दूर करण्यासाठी किरीट सोमय्या मातोश्री भेटीसाठी प्रयत्नशील आहेत. तसंच, शिवसेना खासदार संजय राऊत, अनिल देसाई आणि उद्धव ठाकरे यांचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या माध्यमातून शिवसेनेची मनधरणी करण्याचा प्रयत्न सोमय्या करत आहेत. मात्र, अद्याप त्यांच्या प्रयत्नांना यश आलेलं नाही. गुरूवारी भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनीही उद्धव ठाकरे यांची भेट घेत किरीट सोमय्यांच्यावतीने मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याही प्रयत्नांनाही यश आलं नाही.  


शिवसेनेवर टीका

मुंबई महापालिका निवडणुकीवेळी किरीट सोमय्या थेट शिवसेना नेतृत्त्वावर तुटून पडले होते. या निवडणुकीदरम्यान शिवसेना-भाजप आमने-सामने होती. त्यावेळी शिवसेनेची सत्ता असलेल्या महापालिकेत माफियाराज असल्याचा गंभीर आरोप सोमय्या यांनी केला होता. तसंच उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत 'बांद्रयाचा बॉस' असे शब्द वापरले होते. सोमय्यांच्या या टीकेमुळं त्यांच्या उमेदवारीला शिवसेनेकडून विरोध होत आहे. 


उमेदवारी मिळणार का?

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजपानं किरीट सोमय्यांऐवजी दुसऱ्या कोणाला तरी उमेदवारी द्यावी, अशी शिवसैनिकांची मागणी आहे. तसंच, ईशान्य मुंबईतून सोमय्या यांना उमेदवारी देण्याचा निर्णय शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार आहेत. त्यामुळं किरीट सोमय्या यांना उमेदवारी मिळणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.हेही वाचा -

मनोमिलनानंतरही उद्धव, फडणवीस करणार वेगवेगळा प्रचार

मालाड स्थानकातील उत्तरेकडील पूल दुरुस्तीच्या कामासाठी बंदRead this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा