Advertisement

उद्धव, आदित्य स्नेहभोजनासाठी रवाना

भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी ‘डिनर डिप्लोमसी’ची खेळी करत मंगळवारी सायंकाळी ‘एनडीए’च्या सर्व घटकपक्ष प्रमुखांना स्नेहभोजनासाठी आमंत्रित केलं आहे.

उद्धव, आदित्य स्नेहभोजनासाठी रवाना
SHARES

बहुतेक सर्वच एक्झिट पोलमध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत मिळण्याचे अंदाज वर्तवण्यात आल्याने भाजपाच्या गोटात सध्या आनंदाचं वातावरण पसरलं आहे. असं असूनही विरोधी पक्षांनी हार न मानता तिसऱ्या आघाडीसाठी जुळवाजुळव सुरू केली आहे. त्यातच केंद्रात सत्तास्थापनेसाठी सहयोगी पक्षांची साथ लागली, तर ऐन वेळी दगाफटका व्हायला नको म्हणून भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी ‘डिनर डिप्लोमसी’ची खेळी करत मंगळवारी सायंकाळी ‘एनडीए’च्या सर्व घटकपक्ष प्रमुखांना स्नेहभोजनासाठी आमंत्रित केलं आहे. या स्नेहभोजनासाठी मुंबईतून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे रवाना झाले आहेत.  

कशावर चर्चा?

एक्झिट पोलमध्ये केंद्रातील सत्ता पुन्हा एकदा भाजपाच्या हातात जाईल, असं भाकीत वर्तवण्यात आलं असलं, तरी खऱ्या अर्थान २३ मे रोजी होणाऱ्या मतगणनेनंतरच देशातील सत्तास्थापनेचं चित्र स्पष्ट होईल. त्यामुळे विरोधी पक्षांनी एकमेकांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. 

अमित शहा यांनी देखील एनडीएतील घटकपक्षांच्या प्रमुखांना स्नेहभोजनासाठी आमंत्रित केलं आहे. स्नेहभोजनाआधी होणाऱ्या बैठकीत एनडीएतील घटकपक्षांना कसं स्थान मिळेल, यावर चर्चा होईल. दिल्लीतील अशोका हाॅटेलमध्ये स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं आहे.

कोण राहणार उपस्थित?

या स्नेहभोजनाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासहित संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष व बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, लोकजनशक्ती पक्षाचे अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामविलास पासवान या राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील प्रमुख नेत्यांसह अकाली दलाच्या हरसिमरत कौर बादल, रिपाइंचे रामदास आठवले, अपना दलच्या अनुप्रिया पटेल, आसाम गण परिषद, डीएमडीके या सुमारे २० घटकपक्षांचे नेतेही उपस्थित राहतील.



हेही वाचा-

'स्ट्रॉग रूम आणि मतमोजणी केंद्रांची सुरक्षा वाढवा'- मिलिंंद देवरा

Exit Poll Results: तिसऱ्या आघाडीच्या हालचालींना वेग



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा