Advertisement

खाट का कुरकुरतेय? शिवसेनेचा काँग्रेसला चिमटा

खाट कितीही कुरकुरली तरी कुणी चिंता करू नये, इतकंच शेवटी सांगायचं, असं म्हणत शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून काँग्रेसच्या कुरबुरींवर भाष्य करण्यात आलं आहे.

खाट का कुरकुरतेय? शिवसेनेचा काँग्रेसला चिमटा
SHARES

काँग्रेस काय किंवा राष्ट्रवादी काय, राजकारणात मुरलेल्या शहाण्या लोकांचे पक्ष आहेत. कधी व किती कुरकुरायचे, कधी कूस बदलायची याचा अनुभव त्यांना आहे. सत्तेचा अमाप लोभ उद्धव ठाकरे यांना नाही. राजकारण हे अखेरीस सत्तेसाठीच असते व सत्ता कोणाला नको असे नव्हे, पण उद्धव ठाकरे सत्तेसाठी काहीही करतील असे नेते नाहीत. सगळ्यांच्या गळ्यात मंत्रिपदाचे हार पडले आहेत. त्यात शिवसेनेचा त्यागही मोलाचा आहे हे विसरता येणार नाही. खाट कितीही कुरकुरली तरी कुणी चिंता करू नये, इतकंच शेवटी सांगायचं, असं म्हणत शिवसेनेचं मुखपत्र (shiv sena criticises maharashtra congress through saamana editorial) असलेल्या सामनातून काँग्रेसच्या कुरबुरींवर भाष्य करण्यात आलं आहे. 

मागील काही दिवसांपासून काँग्रेसच्या नेत्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. सत्ताधारी महाविकास आघाडीतील महत्त्वाचा पक्ष असून देखील निर्णय प्रक्रियेत काँग्रेसच्या मंत्र्यांना विश्वासात घेत नसल्याची काँग्रेस नेत्यांची मुख्य तक्रार आहे. शिवाय राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना निधी वाटपात झुकतं माप मिळत असल्याचंही त्यांचं म्हणणं आहे. त्यातच विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या १२ जागांमध्ये तिन्ही पक्षांना समान ४ जागा मिळाव्यात, असा काँग्रेसचा आग्रह आहे. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक घेऊन तोडगा काढावा, अशी काँग्रेसच्या नेत्यांची मागणी आहे. 

हेही वाचा - महाराष्ट्रात तिघाडी सरकारमध्ये बिघाडी, काँग्रेसने पाठिंबा काढावा- रामदास आठवले

यावर भाष्य करताना सामनाच्या अग्रलेखातून संजय राऊत यांनी काँग्रेसला चिमटा काढला आहे. आपल्या अग्रलेखात त्यांनी लिहिलं आहे की, आघाडीच्या सरकारात अधूनमधून असं कुरकुरणं सहन करण्याची तयारी मुख्यमंत्री ठाकरे यांनी ठेवली पाहिजे. काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे कुरकुरणंही तसं संयमी असतं. घरात भावाभावांची भांडणे होतात. इथं तर तीन पक्षांचे सरकार आहे. थोडेफार कुरकुरणे होणारच. ‘मुख्यमंत्र्यांना भेटून काय ते बोलू,’ असं थोरातांनी सांगितलं. त्याच खाटेवर बसलेल्या अशोक चव्हाण यांनीही ‘इंडियन एक्सप्रेस’ला एक जोरदार मुलाखत दिली व तितक्याच संयमाने कुरकुरत सांगितलं की, ‘‘सरकारला अजिबात धोका नाही, पण सरकारमध्ये जरा आमचंही ऐका. प्रशासनातील अधिकारी म्हणजे नोकरशाही वाद निर्माण करीत आहे. आम्ही काय ते मुख्यमंत्र्यांशीच बोलू!’’  

आता समजतं की, कुरकुरत्या खाटेवरचे हे दोन मंत्रीमहोदय मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांचं म्हणणे मांडणार आहेत. मुख्यमंत्री त्यांचं म्हणणं ऐकतील व निर्णय घेतील, पण काँग्रेसचं नेमकं म्हणणं काय आहे? राजकारणातील ही जुनी खाट महाराष्ट्रात कुरकुरू का लागली आहे? आमचं ऐका म्हणजे काय? यावरही आता झोत पडला आहे. थोरात व चव्हाण हे काँग्रेसचे अनुभवी नेते आहेत व त्यांना सरकार चालविण्याचा दांडगा अनुभव आहे. मात्र त्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की, असा दांडगा अनुभव शरद पवार व त्यांच्या पक्षाच्या लोकांपाशीही आहे. तथापी कुरकुर व कुरबुर होताना दिसत नाही. 

प्रशासनातील काही अधिकारी कारभारी असल्यासारखे वागतात व काँग्रेस नेत्यांशी नीट वागत नाहीत, अशी तक्रार काँग्रेसवाले करीत असल्याचं प्रसिद्ध झाले आहे. मुख्य सचिव अजोय मेहता व नागपूरचे पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीविषयी तक्रारीच सुरू आहेत, पण शेवटी अधिकारी कितीही ‘बडा’ असला तरी तो सरकारचा नोकर म्हणून मुख्यमंत्र्यांचेच आदेश पाळतो. मुख्य सचिवांना वारंवार मुदतवाढ मिळत आहे. त्यामुळे प्रशासनातील इतर अधिकार्‍यांत अस्वस्थता आहे, अशी एक तक्रार आहे. यावर चर्चा होऊ शकते, पण प्रशासनाकडून एखादे बेकायदेशीर किंवा नियमबाह्य काम झाल्याची तक्रार नाही. किंबहुना, कोविडच्या संकटात संपूर्ण प्रशासन झुंज देताना दिसत आहे. तरीही चव्हाण-थोरातांचं म्हणणं मुख्यमंत्र्यांनी ऐकून घ्यायलाच हवं. कारण सरकारचा तिसरा पाय काँग्रेसचा आहे.  

हेही वाचा - काँग्रेस हट्टाला पेटली, हव्यात विधान परिषदेच्या ‘इतक्या’ जागा

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा