Advertisement

यंदाही शिवसेनेचा दसरा मेळावा होणार, पण ‘या’ ठिकाणी…

यंदाचा दसरा मेळावा शिवतिर्थाऐवजी कुठल्या ठिकाणी घेण्यात येईल, याचा खुलासा संजय राऊत यांनी केला आहे.

यंदाही शिवसेनेचा दसरा मेळावा होणार, पण ‘या’ ठिकाणी…
SHARES

कोरोनाच्या संकटकाळात शिवसेनेचा दसरा मेळावा होणार की नाही? याकडे तमाम शिवसैनिकांचं लक्ष लागून राहिलेलं असताना शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी या अनिश्चिततेवरून पडदा दूर सारला आहे. एवढंच नाही, तर यंदाचा दसरा मेळावा शिवतिर्थाऐवजी कुठल्या ठिकाणी घेण्यात येईल, याचाही खुलासा केला आहे.

प्रसार माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी सांगितलं की, शिवसेनेचा दसरा मेळावा हा राजकीय असला, तरी तो ऐतिहासिक आणि सांस्कृतिक मेळावा देखील आहे. दरवर्षी हा मेळावा शिवतिर्थावर मोकळ्या व्यासपीठावर घेण्यात येतो, तसाच तो यंदाही मोकळ्या व्यासपीठावरच घेण्यात येईल. सध्या राज्यभरात कोरोनाचं संकट असल्याने काही पथ्य, नियम पाळण्याचं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला केलं आहे. अर्थात तेच नियम आम्हालाही लागू होतात. (shiv sena dussehra rally will not conducting in shivaji park this year says sanjay raut)

हेही वाचा - पायाखालचे दगड का निसटताहेत? उद्धव ठाकरेंचा भाजपला टोमणा

आपले मुख्यमंत्री नियमांचं काटेकोर पालन करणारे आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार आम्ही असं ठरवलं आहे की शिवतिर्थालाच लागून असलेल्या सावरकर स्मारकातील सभागृहात दसरा मेळाव्याचं व्यासपीठ उभारायचं. तिथं शिवसेना पक्षप्रमुख आणि काही मोजके नेते, प्रसारमाध्यम प्रतिनिधी उपस्थित राहतील. या सगळ्यांच्या माध्यमातून फेसबुक, ट्विटर, वृत्तवाहिन्यांद्वारे हा दसरा मेळावा देशभरात, जगभरात जाईल.

यंदाचा दसरा मेळावा सर्वार्थाने महत्त्वपूर्ण ठरणार आहे कारण या मेळाव्यात शिवसेनेचे मुख्यमंत्री भाषण करणार आहेत. गेल्यावर्षीच्या दसऱ्या मेळाव्यात आम्ही म्हटलो होतो की पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल आणि बाळासाहेबांच्या आशीर्वादाने, जनतेच्या कृपेने उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. त्यामुळे ते काय भूमिका मांडतील, याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. शिवसेनेची वाटचाल, कोरोनाचं संकट यावर मुख्यमंत्र्यांची भूमिका सर्वांसाठी दिशादर्शक असेल. त्यामुळे यंदाचा दसरा मेळावा देखील वाजतगाजतच असेल, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.

अंदाजे १०० जणांच्या उपस्थितीत शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा पार पडणार आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा