शिवसेनेकडे गृह, तर राष्ट्रवादीकडे अर्थ मंत्रालय

गुरूवारी जाहीर झालेल्या खातेवाटपाच्या माध्यमातून कुठल्या पक्षाकडे कुठलं खातं राहणार हे देखील पुढं आलं आहे.

SHARE

महत्त्वाच्या खात्यांसाठी अडून बसलेल्या महाविकास आघाडीतील खातेवाटपाचा तिढा अखेर सुटल्यात जमा आहे. गुरूवारी जाहीर झालेल्या खातेवाटपाच्या माध्यमातून कुठल्या पक्षाकडे कुठलं खातं राहणार हे देखील पुढं आलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीत महत्त्वाचं खातं मिळावं म्हणून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू होती. त्यामुळेच विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन जवळ आलं तरी खातेवाटपाचं घोडं जागीचं अडलेलं होतं. त्यावरून विरोधकांकडून सरकारकडून टीकाही केली जात होती. 

हेही वाचा- मुख्यमंत्र्यांचं 'वजनदार' मंत्रीमंडळ, 'या' ६ मंत्र्यांमध्येच वाटली सगळी खाती

अर्थ, गृह, महसूल आणि नगरविकास अशी ४ महत्त्वाची खाती आपल्याकडेच यावी, यासाठी तिन्ही पक्ष प्रयत्नशील होते. त्यासाठी या तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये सातत्याने चर्चा सुरू होती. अखेर शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी चर्चा करून खातेवाटपावर शिक्कामोर्तब केलं.

त्यानुसार शिवसेनेच्या वाट्याला नगरविकास आणि गृह, राष्ट्रवादीच्या वाट्याला अर्थ आणि गृहनिर्माण तर काँग्रेसच्या वाट्याला महसूल खातं आलं. या खातेवाटपानुसार शिवसेनेकडे एकूण १८ तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडे प्रत्येकी १५-१५ खाती आली आहेत. 

संबंधित विषय
ताज्या बातम्या