Advertisement

मुख्यमंत्र्यांचं 'वजनदार' मंत्रीमंडळ, 'या' ६ मंत्र्यांमध्येच वाटली सगळी खाती

महाविकास आघाडी सरकारमधील बहुप्रतिक्षीत खातेवाटपाला अखेर गुरूवारी मुहूर्त मिळाला. मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्रीमंडळातील ६ मंत्र्यांवर सर्व खात्यांची जबाबदारी या खातेवाटपाच्या माध्यमातून सोपवली आहे.

मुख्यमंत्र्यांचं 'वजनदार' मंत्रीमंडळ, 'या' ६ मंत्र्यांमध्येच वाटली सगळी खाती
SHARES

महाविकास आघाडी सरकारमधील बहुप्रतिक्षीत खातेवाटपाला अखेर गुरूवारी मुहूर्त मिळाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या मंत्रीमंडळातील ६ मंत्र्यांवर सर्व खात्यांची जबाबदारी या खातेवाटपाच्या माध्यमातून सोपवली आहे. त्यामुळे हे मंत्रीमंडळ जम्बो जरी नसलं, तरी वजनदार नक्कीच म्हणावं लागेल. या खातेवाटपाला राज्यपालांनी देखील मंजुरी दिली आहे. खाते वाटपावरून विधेयकांनी अधिवेशनात गदारोळ करू नये म्हणून हे खाते वाटप करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन तोंडावर येऊन ठेपलेलं असतानाही नव्या सरकारचं खातेवाटप रेंगाळल्यामुळे विरोधकांकडून सरकारवर तिखट शब्दांत टीका करण्यात येत होती. मंत्र्यांमध्ये खातेवाटपच न झाल्याने येणाऱ्या अधिवेशनात विरोधकांनी कुणाला प्रश्न विचारायचे? असा सवाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित करत मुख्यमंत्र्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. 

त्यानंतर हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने झटपट हालचाली करत खातेवाटप नक्की केलं. त्यानुसार एकूण ६ जणांच्या मंत्रीमंडळावर सर्व खात्यांचा भार सोपवण्यात आला आहे. तर हिवाळी अधिवेशनानंतर नव्या सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार अपेक्षित आहे.

खातेवाटप पुढीलप्रमाणे-

  • एकनाथ शिंदे (शिवसेना) : गृह, नगरविकास, वने, पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, मृदा व जलसंधारण, पर्यटन, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), संसदीय कार्य, माजी सैनिक कल्याण विभाग 
  • सुभाष देसाई (शिवसेना) : उद्योग आणि खनिकर्म, उच्च व तंत्रशिक्षण, क्रीडा व युवक कल्याण, कृषी, रोजगार हमी योजना, फलोत्पादन, परिवहन, मराठी भाषा, सांस्कृतिक कार्ये, राजशिष्टाचार, भूकंप पुनर्वसन, बंदरे आणि खारभूमी विकास
  • छगन भुजबळ (राष्ट्रवादी) : ग्रामविकास, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, अन्न व औषध प्रशासन
  • जयंत पाटील (राष्ट्रवादी) : अर्थ आणि नियोजन, गृहनिर्माण, सार्वजनिक आरोग्य, सहकार व पणन, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, कामगार, अल्पसंख्याक विकास
  • बाळासाहेब थोरात (काँग्रेस) : महसूल, ऊर्जा व अपारंपरिक ऊर्जा, वैद्यकीय शिक्षण, शालेय शिक्षण, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय
  • नितीन राऊत (काँग्रेस) : सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), आदिवासी विकास, महिला व बाल विकास, वस्त्रोद्योग, मदत व पुनर्वसन, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांतील प्रत्येकी २ अशा एकूण ६ नेत्यांनी शिवाजी पार्क मैदानावरील भव्यदिव्य सोहळ्यात मंत्रीपदाची शपथ घेतली होती.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा