Advertisement

बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो की…, सचिन वाझेंच्या आरोपांवर अनिल परब म्हणाले..

माझं दैवत हिंदूहृदयसम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि माझ्या दोन मुलींची शपथ घेऊन सांगतो, माझ्यावरील आरोप खोटे आहेत, असं अनिल परब म्हणाले.

बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो की…, सचिन वाझेंच्या आरोपांवर अनिल परब म्हणाले..
SHARES

राष्ट्रीय तपास यंत्रणे (एनआयए)च्या ताब्यात असलेल्या निलंबित सहायक पोलीस निरिक्षक सचिन वाझे यांनी एक पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याप्रमाणेच शिवसेना नेते आणि परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावर देखील खंडणी वसूल करण्याची मागणी केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. या आरोपांना अनिल परब (anil parab) यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिलं.

अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत खंडणीसंदर्भातील आरोप फेटाळून लावताना सांगितलं की, माझं दैवत हिंदूहृदयसम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि माझ्या दोन मुलींची शपथ घेऊन सांगतो, माझ्यावरील आरोप खोटे आहेत. केवळ मला बदनाम करण्यासाठी रचलेलं हे कारस्थान आहे. एसबीयुटी प्रकल्पाच्या ट्रस्टींकडून मी ५० लाख रुपये मागितले आणि जानेवारी २०२१ मध्ये मुंबई महापालिकेच्या कंत्राटदारांकडून प्रत्येकी २ कोटी रुपये जमा करण्याच्या सूचना दिल्या, असे दोन आरोप सचिन वाझे यांनी माझ्यावर केले आहेत.

जून आणि जानेवारीमध्ये मी त्यांना सांगितल्याचं जर ते म्हणत असतील, तर इतके दिवस ते गप्प का होते. परमबीर सिंग यांच्याही पत्रात याचा कुठेही उल्लेख नाही. कारण या दोन्ही गोष्टी धादांत खोट्या आहेत. मी सच्चा शिवसैनिक आहे. माझ्यावर खंडणीचे कोणतेही संस्कार नाहीत. 

हेही वाचा- अनिल देशमुखांनी पवारांच्या मनधरणीसाठी मागितली खंडणी, आता सचिन वाझेंचा ‘लेटरबाॅम्ब’

भाजपचे नेते दोन-तीन दिवस आरडाओरड करत होते. आणखी एक बळी घेऊ म्हणत होते. म्हणजे हे प्रकरण त्यांना आधीपासून माहिती होतं. सचिन वाझे आज पत्र देणार होता, त्यामुळे (संजय राठोड आणि अनिल देशमुख यांच्यानंतर) तिसरी विकेट पडणार असं भाजप नेते म्हणत होते. 

मुख्यमंत्र्यांना बदनाम करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या माणसाला बदनाम करणं गरजेचं आहे हा एका धोरणाचा भाग आहे. यातून सरकारला बदनाम करण्याच्या धोरणाचा हा एक भाग आहे. एनआयए, सीबीआय, रॉ, नार्काेटिक्स अशा कोणत्याही चौकशीला सामोरा जायची माझी तयारी आहे. माझी चौकशी करावी. चौकशीत सत्य बाहेर येईल, असं म्हणत अनिल परब यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले. 

दरम्यान, सचिन वाझे यांनी ‘एनआयएल’ पत्र लिहून सेवेतील नियुक्तीसाठी अनिल देशमुखांनी खंडणी मागितल्याचा दावा करतानाच अनिल परब यांनी महापालिकेशी संलग्न असलेल्या ५० कंत्राटदाराकडून प्रत्येकी २ कोटी रुपये खंडणी गोळा करण्यास सांगितलं होतं, असंही सचिन वाझे यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

(shiv sena leader anil parab denied allegations of sachin vaze)

संबंधित विषय
POLL

मुंबई इंडियन्स दिल्ली कॅपिटल्सला हरवून सलग तिसरा विजय नोंदवणार का? काय वाटते? प्रतिक्रिया नोंदवा.
Submitting, please wait ...
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा