Advertisement

हाथरस घटनेवरून शिवसेना आक्रमक, राष्ट्रपतींना पत्र लिहून केल्या ‘या’ ६ मागण्या

शिवसेना प्रवक्त्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी या प्रकरणी थेट राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहून दोषींना कडक शिक्षा करण्याची मागणी केली आहे.

हाथरस घटनेवरून शिवसेना आक्रमक, राष्ट्रपतींना पत्र लिहून केल्या ‘या’ ६ मागण्या
SHARES

माणुसकीला काळीमा फासणाऱ्या हाथरस सामुहिक बलात्कार घटनेवरून विरोधक उत्तर प्रदेश आणि केंद्रातील भाजप सरकारला लक्ष्य करत असताना शिवसेना देखील आक्रमक झाली आहे. शिवसेना प्रवक्त्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी या प्रकरणी थेट राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहून दोषींना कडक शिक्षा करण्याची मागणी केली आहे. (shiv sena leader neelam gorhe wrote a letter to president of india ramnath kovind on hathras gang rape case)

उत्तर प्रदेशमधील हाथरसमधील १९ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आल्याची बातमी वाचून खूप दु:ख झालं. १४ सप्टेंबर रोजी घडलेल्या या घटनेमध्ये तिचा गळा आवळण्यात आल्याने तिला गंभीर जखमा झाल्या आणि २९ सप्टेंबर २०२० रोजी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. पीडितेचा मृतदेह तिच्या नातेवाईकांना सुपूर्द करण्यात आला नाही. पोलिसांनी पीडितेच्या मृतदेहावर परस्पर अंत्यसंस्कार केले. देशभरात चुकीचा संदेश गेला आहे. 

उत्तर प्रदेश राज्यात जिथे महिला सुरक्षित नाही. अशा ठिकाणी साक्षीदार संरक्षण कायदा आणि संबंधित मुलींना संरक्षण देणं अशा आरोपींना लवकरात लवकर शिक्षा होणं अतिशय गरजेचं आहे, असं नीलम गोऱ्हे यांनी आपल्या पत्रात नमूद केलं आहे. सोबतच गोऱ्हे यांनी पत्रामध्ये ६ महत्वाचे मुद्दे मांडले आहेत. या पत्राची एक प्रत महाष्ट्राच्या राज्यपालांनाही पाठवण्यात आली आहे.

हेही वाचा - ‘फिल्म सिटी’ ऐवजी गुंडांपासून ’क्लिन सिटी’ वर भर द्या, गृहमंत्र्यांची योगींवर टीका

गोऱ्हे यांनी मांडलेले मुद्दे पुढीलप्रमाणे-

  • या प्रकरणातील आरोपींना जामीन मिळू नये
  • न्यायालयीन कार्यवाहीसाठी अनुभवी व कार्यक्षम सरकारी वकिलांची नेमणूक करावी
  • या प्रकरणात योग्य पुरावे गोळा करण्यात यावेत
  • साक्षीदारांना पोलिसांकडून पूर्ण सुरक्षा मिळावी.
  • न्यायालयात वेळीच आरोपपत्र दाखल करण्यात यावं
  • आरोपींना फाशीची शिक्षा मिळण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारनं आपल्या वकिलांना सर्व प्रकारची कायदेशीर मदत द्यावी

साधारण दोन आठवड्यापूर्वी उत्तर प्रदेशमधील हाथरसमध्ये १९ वर्षीय तरुणीवर सवर्ण समाजातील चार जणांनी सामूहिक बलात्कार केला होता. एवढंच नाही, तर बलात्कारानंतर या तरुणीची जीभ कापून, तिची मान मोडण्याचं अमानुष कृत्य देखील त्यांनी केलं होतं. दिल्लीच्या सफदरजंग येथील रुग्णालयात पीडित तरूणीवर उपचार सुरु होते. दुर्दैवाने तिचा मृत्यू झाला. त्यानंतर यूपी पोलिसांनी तिच्या कुटुंबियांच्या अनुपस्थितीत तरूणीवर रातोरात अंत्यसंस्कार केले. या घटनेवरून देशभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. त्याचबरोबर महिलांच्या सुरक्षेचा मुद्दाही उपस्थित केला जात आहे. 

संबंधित विषय
Advertisement