SHARE

“ज्या प्रकरणात शरद पवार यांचं नाव नाही, तरीही त्यांच्यावर ईडी गुन्हा दाखल करत असेल, तर लोकांच्या मनात शंका निर्माण होणारच”, असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना समर्थन दिलं.  

काय म्हणाले राऊत?

“अख्ख्या महाराष्ट्राला ठाऊक आहे की, ज्या बँक घोटाळ्याअंतर्गत ईडीने एफआयआर दाखल केला आहे, त्या बँकेत शरद पवार कुठल्याही पदावर नव्हते. एवढंच नाही, तर तक्रारदाराने आपण कधीही शरद पवारांचं नाव घेतलं नसल्याचं म्हटलं आहे. अण्णा हजारे यांनी देखील पवार यांना क्लीन चीट दिली आहे. तरीही त्यांच्या नावे गुन्हा नोंदवण्यात आल्याने लोकांना संशय घेण्यास जागा निर्माण झाली आहे.” 

भाजपवर निशाणा

भलेही आमची राजकीय विचारधारा वेगळी आहे. मात्र महाराष्ट्रात अशी परंपरा कधीच नव्हती. तपास यंत्रणांचा इतका गैरफायदा कुणीच घेतला नव्हता. त्यामुळे ईडीने त्यांच्यासोबत चुकीचं केलं असंच मी म्हणेन, अशा शब्दांत राऊत यांनी भाजपवर अप्रत्यरित्या निशाणा साधला.  

तणावाचं वातावरण

महाराष्ट्र राज्य शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी शरद पवार यांच्यावर अंमलबजावणी संचलनालयाकडून (ईडी) गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यामुळे राष्ट्रवादीचे संतप्त कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. ‘ईडी’ने पवार यांच्यावर गुन्हा दाखल केलेला असला, तरी अजून त्यांना चौकशीसाठी समन्स पाठवलेलं नाही. 

जोपर्यंत चौकशीसाठी बोलवण्यात येत नाही, तोपर्यंत कार्यालयात येऊ नये, असा ई-मेल ईडीने पवार यांना पाठवला आहे. तरीही ईडी कार्यालयात जाणार यावर पवार ठाम आहेत. परंतु पवार यांनी ईडीच्या कार्यालयात गेल्यास राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघण्याची शक्यता लक्षात घेऊन मुंबई पोलिस आयुक्त संजय बर्वे यांनी ईडी कार्यालयात न जाण्याची विनंती त्यांना केली.हेही वाचा-

ईडीच्या कार्यालयात जाण्याचा शरद पवार यांचा निर्णय रद्द

ईडीची शाखा भाजप कार्यालयात सुरू करा, काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांची भाजपवर टीकासंबंधित विषय
ताज्या बातम्या