Advertisement

विरोधकांनी टांग अडवायची गरज नाही, संजय राऊतांचा भाजपला टोला

जो काही नाराजीचा धूर बाहेर सोडला जातोय, त्यात अर्थ नाही. हे धुकं आहे. ते आता खाली बसलं आहे. विरोधी पक्षाला हवं आहे तसं काही घडत नसल्यानेच त्यांचा नाराज शब्दावर जास्त जोर आहे.

विरोधकांनी टांग अडवायची गरज नाही, संजय राऊतांचा भाजपला टोला
SHARES

महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांतील नाराजी वाढली असून सरकारचं काही खरं नाही, असं विरोधी पक्षांकडून भासवलं जात असताना विरोधी पक्षांनी आमच्यामध्ये टांग अडवायची गरज नाही. आमचं आम्ही बघू, अशा शब्दांत शिवसेना नेते खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी विरोधकांना फटकारलं आहे.  

मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी भाजपवर (bjp) हल्ला चढवला. ते म्हणाले, संजय राऊत काय करतात किंवा करत नाहीत हा आमचा प्रश्न आहे. महाविकास आघाडी सरकारमधील नेते काय काम करतात हे विरोधकांना दिसत नसेल, तर तो त्यांचा दृष्टीदोष आहे. मुळात त्यांनी महाविकासआघाडीकडे पाहू देखील नाही. कारण सरकारचं काम उत्तमरित्या सुरू आहे. 

हे तर पक्षाचं वैफल्य

खरंतर राज्य सुरळीत चालावं ही विरोधी पक्षांची देखील भूमिका असायला हवी. ती आम्हाला दिसत नाही. फडणवीस (devendra fadnavis) जेव्हा संन्यास घेण्याची भाषा करतात, तेव्हा ते त्या पक्षाचं वैफल्य आहे. राज्याचे प्रश्न सोडवण्यासाठी विरोधी पक्षांनी आणि त्यांच्या नेत्याने राज्य सरकारच्या खांद्याला खांदा लावून काम केलं तर राज्याची जनता त्यांना दुवा देईल.

हेही वाचा- जनाब मुख्यमंत्र्यांना हे झेपेल का?, भाजपचा खोचक सवाल

मतभेद असणारच

राहिला प्रश्न नाराजीचा, तर सरकार एक पक्षाचं असो, दोन पक्षाचं असो, महाविकास आघाडीचं असो किंवा अटलजींसारखं ३२ पक्षांचं असो. मनुष्य म्हटला की कामाच्या पद्धतीवरून लोकांमध्ये मतभेद असू शकतो. याचा अर्थ कुणी नाराज आहे, असा होत नाही. कॅबिनेटमध्ये एखाद्या विषयावर दुसरं मत असू शकतं. म्हणून ती कॅबिनेटची बैठक बोलावली जाते. त्यातून निर्णय घेतला जातो. हा जो काही नाराजीचा धूर बाहेर सोडला जातोय, त्यात अर्थ नाही. हे धुकं आहे. ते आता खाली बसलं आहे, अशा शब्दांत संजय राऊत यांनी विरोधी पक्षातील नेत्यांना फटकारलं.

नाराज शब्दावर जोर

विरोधी पक्षाला हवं आहे तसं काही घडत नसल्यानेच त्यांचा नाराज शब्दावर जास्त जोर आहे. त्यामुळे सगळा आनंदच आहे. कोरोनाचं संकट नसतं तर मुख्यमंत्र्यांनी योजलेल्या अनेक योजना पुढे नेता आल्या असत्या. पण आता हळूहळू कामाला आणि सरकारला गती मिळत आहे. मी ठामपणे सांगू शकतो की सध्याचं सरकार ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल. उद्धव ठाकरेंच्या (uddhav thackeray) नेतृत्वाखालीच हे सरकार चालेल, असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा