Advertisement

आता तर फक्त शिवप्रसाद दिलाय, शिवभोजन देण्याची वेळ आणू नका, संजय राऊतांचा भाजपला इशारा

शिवसेना भवन हे मराठी अस्मितेचं प्रतिक आहे. ज्या कुणी शिवसेना भवनवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यांना शिवसैनिकांनी चांगलाच शिवप्रसाद दिला आहे.

आता तर फक्त शिवप्रसाद दिलाय, शिवभोजन देण्याची वेळ आणू नका, संजय राऊतांचा भाजपला इशारा
SHARES

शिवसेना भवन हे मराठी अस्मितेचं प्रतिक आहे. ज्या कुणी शिवसेना भवनवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यांना शिवसैनिकांनी चांगलाच शिवप्रसाद दिला आहे. हा प्रसादापुरताच मर्यादित राहू द्या, त्यांना शिवभोजन थाळी देण्याची वेळ आणू नका, अशा शब्दांत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपला इशारा दिला आहे.

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना दैनिकातील अग्रलेखातून अयोध्येतील रामजन्मभूमी जमीन घोटाळ्याच्या चौकशीची मागणी करण्यात आली होती. यानंतर भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील दादर येथील शिवसेना भवनसमोर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी भाजप कार्यकर्ते आणि शिवसैनिकांमध्ये तुफान राडा झाला. यावरून भाजप नेत्यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली.

हेही वाचा- शिवसेनेने सामना बंद करून बाबरनामा काढावा, अतुल भातखळकरांचा घणाघात

त्यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले, शिवसेना भवनावर हल्ला करण्याची हिंमत कोणामध्येच नाही. एक टोळकं आलं होतं. आता ते कशासाठी आलं होतं आणि त्यांचा संबंध काय हे समजून घेतलं पाहिजे. शिवसेना भवन हे महाराष्ट्राच्या अस्मितेचं प्रतिक आहे. राजकीय मतभेद असू शकतात. पण ती बाळासाहेब ठाकरेंची वास्तू आहे. मराठी अस्मितेचं प्रतिक असणारी वास्तू आहे. त्याच्यावर चाल केली तर शिवसैनिक आणि मराठी माणूस शांत बसेल का?, असा प्रतिप्रश्न त्यांनी प्रसारमाध्यांशी बोलताना उपस्थित केला. 

मुळात शिवसेना भवनसमोर जमण्याचं कारण काय? राम मंदिरासंबंधी काही आरोप केले असं म्हणत असाल तर तुम्हाला लिहिता वाचता येतं का? तुम्हाला शिक्षणाचा गंध आहे का? सामनात काय लिहिलं आहे ते आधी वाचा. शिवसेनेचे प्रवक्ते काय बोललेत ते ऐकून घ्या. जे आरोप झाले आहेत त्यांची चौकशी व्हावी आणि जर ते आरोप द्वेषबुद्धीने केले असतील तर आरोप करणाऱ्यांना सोडू नका असं अग्रलेखात स्पष्ट म्हटलं आहे. त्याच्यावर एखाद्याला मिरच्या का झोंबाव्यात? भाजपवर कुठेही थेट आरोप केलेला नाही. भाजपने घोटाळा केल्याचं कुठेही म्हटलेलं नाही, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.

ट्रस्टमध्ये भाजपचे कार्यकर्ते आहेत का? याबद्दल खुलासा मागणं गुन्हा आहे का?, असा प्रश्न देखील संजय राऊत यांनी यावेळी विचारला. ज्यांनी शिवसेना भवनवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यांना शिवसैनिकांनी शिवप्रसाद दिला आहे. हा प्रसादापुरताच मर्यादित राहू द्या, त्यांना शिवभोजन थाळी देण्याची वेळ आणू नका, असा इशारा देखील संजय राऊत यांनी दिला. 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा