Advertisement

खा. श्रीकांत शिंदेंनी लावलेल्या खुंटवलीतील झाडांनाही आग

खा. शिदे यांनी लावलेल्या खुंटवलीतील झाडांनाही आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या रवाना झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती खा. शिंदे यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली.

खा. श्रीकांत शिंदेंनी लावलेल्या खुंटवलीतील झाडांनाही आग
SHARES

शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी अंबरनाथमधील मांगरूळ इथं लावलेल्या झाडांना काही दिवसांपूर्वीच भूमाफियांनी आग लावली होती. या आगीची घटना ताजी असतानाच शुक्रवारी खा. शिदे यांनी लावलेल्या खुंटवलीतील झाडांनाही आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या रवाना झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती खा. शिंदे यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली. वारंवार होणाऱ्या आगीच्या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त करत जोपर्यंत या प्रकरणातील दोषींना शिक्षा होत नाही, तोपर्यंत आता माघार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.


लोकसहभागातून झाडे

वृक्षारोपण महाअभियानाद्वारे खा. शिंदे यांनी लोकसहभागातून कल्याण-अंबरनामधील डोंगरांवर लाखो झाडं लावली आहेत. मांगरूळ डोंगरावर १ लाखांहून अधिक तर खुटंवली डोंगरावर ३० हजाराहून अधिक झाडं लावली आहेत. गेल्या वर्षी डिसेंबर २०१७ मध्ये मांगरूळमधील झाडांना भूमाफियांकडून आग लावण्यात आली. त्यात २० हजार झाडं जळाली. तर त्यानंतर वनविभागाकडून अपेक्षित अशी कारवाई न झाल्यानं गेल्या आठवड्यात पुन्हा मांगरूळ येथील झाडांना आग लागली. या आगीत ७० टक्के झाडं जळून त्यांची राख झाली.


वनविभाग कार्यालयावर मोर्चा

या घटनेनंतर शिवसैनिक आणि खा. शिंदे आक्रमक झाले नि त्यांनी ४ दिवसांपूर्वी ठाण्यातील वनविभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढत भूमाफियांविरोधात कारवाई करण्याबरोबरच संबंधित अधिकार्याच्या निलंबनाची मागणी केली. त्यानुसार एका वन अधिकाऱ्याचं त्वरीत निलंबनही करण्यात आलं. शिवसेनेकडून काढण्यात आलेल्या मोर्चात शिवसैनिक चांगलेच आक्रमक दिसले. शिवसैनिकांनी झाडांची राख वन अधिकाऱ्यांच्या तोंडाला फासली, तर झाडांच्या कुंड्याही कार्यालयात फेकून दिल्या.


भूमाफिया सक्रीय

या मोर्चानंतर तरी भूमाफियांना चाप बसेल अशी आशा होती. प्रत्यक्षात मात्र भूमाफिया अजूनही सक्रीय असल्याचं आणि वनविभाग झोपेत असल्याचं समोर आलं ते शुक्रवारच्या खुंटवलीतील झाडांच्या आगीमुळं. शुक्रवारी दुपारी खुंटवलीतील ३० हजार झाडांना पेटवून देण्यात आलं आहे.


आग लावायला मोकळे

हे सर्व वनविभागाच्या दुर्लक्षामुळे आणि उदासीन धोरणामुळं होत असल्याचा पुनरूच्चार खा. शिंदे यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना केला. खुंटवली इथं मोठं गवत उगवलं आहे. हे गवत आम्ही काढायला गेलो तर आम्हाला त्यांनी रोखलं. पण त्याचवेळी भूमाफिया मात्र आग लावायला मोकळे असल्याचं म्हणत त्यांनी वन विभागावर टीका केली.

वनमंत्र्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. पण जोपर्यंत या भूमाफियांच्या मुसक्या आवळल्या जात नाहीत तोपर्यंत आमचं याविरोधातील आंदोलन सुरूच राहिल असा इशाराही खा. शिंदे यांनी दिला आहे.


हेही वाचा-

शिवसेनेने फासली वन अधिकाऱ्याच्या तोंडाला राख! वाचा...

फक्त ५० कोटी झाडे लावल्याची टिमकी वाजवायचीय का? श्रीकांत शिंदे

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा