Advertisement

बाळासाहेब ठाकरे स्मारकाचं गणेशपूजन संपन्न, ठाकरे कुटुंबियांसह मुख्यमंत्र्यांची उपस्थिती

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून त्यांना आदरांजली वाहत अभिवादन करण्यात येत आहे. दादरच्या शिवाजी पार्क येथील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाऊनही शिवसैनिकांकडून बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यात येत आहे.

बाळासाहेब ठाकरे स्मारकाचं गणेशपूजन संपन्न, ठाकरे कुटुंबियांसह मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
SHARES

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक दादरच्या महापौर बंगल्यात उभारलं जाणार असून स्मारकाच्या कामाचा अखेर बुधवारी गणेशपूजनानं श्रीगणेशा करण्यात आला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाकरे कुटुंबाच्या उपस्थितीत गणेशपूजन संपन्न झालं असून आता लवकरच स्मारकाच्या प्रत्यक्ष कामाला सुरूवात होणार आहे. दरम्यान गणेशपूजनाच्या वेळेस महापौर बंगल्याच्या जागेचं हस्तांतरण करण्यात आलं असून यासंबंधीची कागदपत्रं मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्या हस्ते राष्ट्रीय स्मारक समितीकडे सूपूर्द करण्यात आली.


जागेचं हस्तांतरण 

दादरच्या महापौर बंगल्यात बाळासाहेबांचं स्मारक साकारण्याचं निश्चित झाल्यानंतर पुढील पाऊल उचलत महापौर निवास राणीच्या बागेत हलवण्यात आलं आहे. तर मंगळवारी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत स्मारकासाठी १०० कोटींचा निधी देण्याबरोबरच स्मारकाच्या कामाची जबाबदारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए)कडे सोपवण्याचे दोन महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. या निर्णयामुळे स्मारकाच्या कामाचा मार्ग मोकळा झाला असतानाच बुधवारी, बाळासाहेबांच्या जयंतीदिनी गणेशपूजन करण्यात आलं आहे. त्यामुळे आता लवकरच स्मारक दृष्टीक्षेपात येणार असल्याचं म्हटलं जात आहे. 


लवकरच कामासाठी निविदा

स्मारकासाठी महापौर बंगल्याची जागा मुंबई महानगरपालिकेकडून राष्ट्रीय स्मारक समितीला भाडेपट्ट्याने देण्यात आली आहे. त्यानुसार या जागेच्या हस्तांतरणाची कागदपत्रं यावेळी समितीकडे सुपूर्द करण्यात आली. गणेशपूजन झालं असलं तरी आता हे काम एमएमआरडीएकडे सोपवण्यात आल्यानं अजून निविदा काढणं आणि इतर प्रक्रिया राबवणं बाकी आहे. त्यामुळे निविदा काढत कंत्राट अंतिम करत कामास सुरूवात करण्यास आणखी काही महिने जातील अशी माहिती एमएमआरडीएतील सुत्रांनी दिली आहे.


देशभरातून आदरांजली

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून त्यांना आदरांजली वाहत अभिवादन करण्यात येत आहे. दादरच्या शिवाजी पार्क येथील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाऊनही शिवसैनिकांकडून बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यात येत आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक दिग्गजांनीही ट्विटरच्या माध्यमातून बाळासाहेबांना अभिवादन केलं आहे. धाडसी, कुशाग्र बुद्धीमत्ता असलेलं असं बाळासाहेबांचं व्यक्तिमत्व होतं असं म्हणत मोदींनी बाळासाहेबांप्रतिच्या आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तर आमचे श्रद्धास्थान, प्रेरणास्थान असं म्हणत मुख्यमंत्र्यांनीही बाळासाहेबांना आदरांजली वाहिली आहे. याचवेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या ट्विटरवरील फोटोची चांगलीच चर्चा रंगली आहे.आदित्य ठाकरेंनी बाळासाहेबांसोबतच्या आपल्या आठवणींना उजाळा देत, त्यांच्याबरोबरचा एक खास फोटो शेअर करत बाळासाहेबांना अनोखी आदरांजली वाहिली आहे. आदित्य ठाकरे बॅटींग करत आहेत, तर त्यांच्या मागे असलेले बाळासाहेब त्यांचं कौतुक करत आहेत असा हा फोटो आहे.



हेही वाचा -

३३ हजार रुद्राक्षांनी साकारली बाळासाहेबांची प्रतिमा

प्रियंका गांधी सक्रिय! काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा