Advertisement

आमदारांच्या खांद्यावरील विभागप्रमुखांचा भार होणार हलका


आमदारांच्या खांद्यावरील विभागप्रमुखांचा भार होणार हलका
SHARES

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत आता विभागप्रमुखांची खांदेपालट केली जात आहे. निवडणुकीच्या दृष्टीकोनातून पक्षांतर्गत बांधणी करण्याकरता आता आमदारांवर असलेली विभागप्रमुखांची जबाबदारी काढून त्यांच्या खांद्यावरील भार हलका केला जाणार असल्याचं बोललं जात आहे.


पदाधिकाऱ्यांच्या खांद्यावर जबाबदारी

भाजपाकडून युतीसाठी मनधरणी केली जात असली तरी शिवसेनेकडून वारंवार एकला चलो रेचा नारा दिला जात आहे. त्यामुळेच आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी पदाधिकाऱ्यांच्या खांद्यावर जबाबदारी टाकली जाणार आहे. त्यासाठीच आता ज्या आमदारांकडे विभागप्रमुख पदाची जबाबदारी आहे, त्यांना त्यातून मुक्त करून अन्य पदाधिकाऱ्यांकडे विभागप्रमुखाची जबाबदारी सोपवण्याचा विचार शिवसेना करत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी असा विचार करत त्यांनी सर्वांशी चर्चा करण्यास सुरुवात केली असल्याचं शिवसेनेच्या सुत्रांकडूनच समजते.


विभागप्रमुखपदांची जबाबदारी यांच्याकडे

शिवसेनेचे मुंबईत एकूण १२ विभागप्रमुख आहेत. त्यामध्ये आमदार असलेले ५ विभागप्रमुख आहेत. त्यामध्ये विधीमंडळातील शिवसेनेचे मुख्य प्रतोद असलेले आमदार सुनील प्रभू यांच्यासह अनिल परब, संजय पोतनीस, विलास पोतनीस, सदा सरवणकर आदींकडे विभागप्रमुखपदांची जबाबदारी आहे.


आमदारांची मुक्तता

यामध्ये अनिल परब आणि विलास पोतनीस हे विधानपरिषदेचे सदस्य आहेत. तर सुनील प्रभू, संजय पोतनीस आणि सदा सरवणकर हे विधानसभा आमदार असल्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांना आपल्या मतदार संघांची बांधणी करतानाच त्यासाठी अधिक वेळ देता यावा याकरता आमदारांना या विभागप्रमुखपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात येत असल्याचं समजतं.


यांचीही होणार खांदेपालट

मंगेश सातमकर, आशिष चेंबुरकर आणि पांडुरंग सकपाळ हे विधानसभेचे संभाव्य उमेदवार असल्यामुळे त्यांच्याकडील विभागप्रमुख पदांची जबाबदारी काढावी की नाही याबाबतही शिवसेना पक्षप्रमुख आढावा घेत असल्याचं बोललं जात आहे. विभागप्रमुखांबरोबरच महिला विभाग संघटकांचीही खांदेपालट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा