कोल्हापुरात महालक्ष्मीच्या दर्शनानंतर फुटणार युतीच्या प्रचाराचा नारळ

कोल्हापुरात महालक्ष्मी मंदिरात अंबाबाईचं दर्शन घेऊन युतीचा प्रचाराचा नारळ फोडण्यात येणार असल्याची माहिती असून, २४ मार्चला कोल्हापुरात शिवसेना-भाजपा युतीची एकत्रित सभा होणार आहे.

SHARE

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी रात्री उशीरा 'मातोश्री'वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत महाराष्ट्रातील सर्व ४८ लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतल्यानंतर युतीच्या प्रचाराचा कार्यक्रमदेखील ठरल्याचंही समोर आलं आहे. कोल्हापुरात महालक्ष्मी मंदिरात अंबाबाईचं दर्शन घेऊन युतीच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात येणार आहे. त्यानंतर २४ मार्चला कोल्हापुरात शिवसेना-भाजपा युतीची एकत्रित सभा होईल.


कोल्हापुरावर एकमत

या बैठकीत आदित्य ठाकरे, सुभाष देसाई, मिलिंद नार्वेकर, सुधीर मुनगुंटीवार आणि चंद्रकांत पाटील उपस्थित होते. यावेळी कोल्हापुरातून प्रचाराला सुरुवात करण्यावर एकमत झालं असून, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, नाशिक, नवी मुंबई आणि पुण्यातही एकत्र प्रचारसभा घेण्याचं बैठकीत ठरलं आहे. युतीच्या चर्चेनुसार लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना २३ आणि भाजपा २५ लोकसभा मतदारसंघात उमेदवार उभे करणार असल्याचं अगोदरच जाहीर करण्यात आलं आहे.


एकत्र मेळावे  

बैठकीदरम्यान, युतीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनी, प्रचाराच्या सुरुवातीलाच युतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचे एकत्र मेळावे आयोजित केले आहेत. येत्या १५, १७ आणि १८ मार्च रोजी हे मेळावे होणार आहेत. पहिला मेळावा येत्या शुक्रवारी १५ मार्च रोजी दुपारी अमरावतीला होणार असून युतीचा दुसरा पदाधिकारी मेळावा १५ रोजी रात्री नागपूरला होणार आहे.

युतीचा तिसरा मेळावा रविवार १७ मार्च रोजी दुपारी औरंगाबादला होणार असून याच दिवशी युतीचा चौथा मेळावा नाशिकला होईल. युतीचा पाचवा मेळावा सोमवार १८ मार्च रोजी दुपारी नवी मुंबईत होणार असून याच दिवशी युतीचा सहावा मेळावा १८ मार्च रोजी रात्री पुण्यात होणार असल्याचं या बैठकीत ठरवण्यात आलं आहे.हेही वाचा -

प.रे.वर विनातिकीट प्रवास करणाऱ्यांकडून ११६.८६ कोटींचा दंड वसूल

राजीनामा देणार नाही; राधाकृष्ण विखे-पाटील यांचं स्पष्टीकरणसंबंधित विषय