मागासवर्गीय अायोगाच्या अहवालाची वाट न पाहता आरक्षण द्या - उद्धव ठाकरे


SHARE

मराठा आरक्षणप्रकरणी शिवसेनेनंही अाक्रमक भूमिका घेतली असून मराठा समाजाला त्वरित आरक्षण देण्याची मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. मागासवर्गीय आयोगाच्या अहवालाची वाट न पाहता आरक्षण द्यावं. विधी मंडळाला आरक्षणासंबंधी निर्णय देण्याचा अधिकार आहे. त्या अधिकाराचा वापर करावा, विधीमंडळाचं विशेष अधिवेशन बोलवावं नि घटनादुरूस्ती करत आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावावा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. मराठा आरक्षणप्रकरणी सोमवारी उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर सेनेच्या मंत्र्यांची, आमदारांची विशेष बैठक बोलावली होती. या बैठकीत आरक्षण देण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.


म्हणून अांदोलनाला हिंसक वळण

मराठा आरक्षणासाठी दोन वर्षांपासून सुरू असलेल्या मूक मोर्चाचं आता ठोक मोर्चात रुपातर झालं आहे. राज्य सरकार आरक्षणाच्या मागणीकडं कानाडोळा करत असल्यानं मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाला असून आंदोलन हिंसक झालं आहे. त्यामुळं राज्याचं वातावरण तापलं असून आता हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी विरोधकांसह शिवसेनेनंही पुढाकार घेतला आहे. त्याचाच भाग म्हणून आरक्षणाबाबतची आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी सेनेच्या मंत्री-आमदारांची बैठक घेतली.


४ वाजता मुख्यमंत्र्यांना भेटणार

मागासवर्गीय आयोगाच्या अहवालाची वाट न पाहता आरक्षण द्यावं, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ही मागणी मुख्यमंत्र्यांसमोर ठेवण्यासाठी सेनेचे मंत्री आणि आमदार सोमवारी चार वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचीही माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली. दरम्यान, मराठा आरक्षणाचा मुद्दा न्यायप्रविष्ट असला तरी सरकार वेळ काढत असल्याचं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांनी विशेष विधीमंडळ अधिवेशन बोलावत आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावावा, अशी मागणी केली आहे.


राजीनामा देणे योग्य की अयोग्य?

कृपया कोणतंही विघातक पाऊल उचलू नका, अशी विनंती मी मराठा समजाला करेन. कोणत्याही स्थितीत शिवसेना तुमच्यासोबत अाहे. जर मुख्यमंत्र्यांनी विशेष अधिवेशन बोलावण्याची घोषणा केली असेल तर भाजपला कोंडीत पडकणाऱ्या शिवसेनेनं राजीनामा देणं योग्य अाहे की अयोग्य, हे तुम्हीच ठरवा. हा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्यासाठी विधिमंडळात अाणि देशाच्या संसदेतही शिवसेना अापली भूमिका मांडण्यासाठी ठाम अाहे, असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.


हेही वाचा -

मराठा मोर्चाचा 'क्रांतीदिनी' पुन्हा एल्गार!

मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार- मुख्यमंत्रीसंबंधित विषय
ताज्या बातम्या