Advertisement

शिवसेना आमदार शिवसेना मंत्र्यांवर नाराज


शिवसेना आमदार शिवसेना मंत्र्यांवर नाराज
SHARES

वांद्रे - बुधवारी दिवसभर शिवसेना मंत्री आणि आमदार यांच्या बैठकीचा सिलसिला सुरु होता. सकाळी मातोश्रीवर शिवसेना मंत्र्यांची बैठक होती, त्याचवेळी विधान परिषदेच्या अध्यक्षांनी गटनेत्यांच्यी बैठक बोलावली होती.  त्यावेळी शिवसेनेचे गटनेते हजर होते. बैठकीनंतर शेतकरी कर्जमाफीसाठी विधिमंडळात गोंधळ झाला. त्यानंतर शेतकरी कर्जमाफीसाठी शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा बंगल्यावर जाऊन भेट घेतली. 

तसेच शेतकरी कर्जमाफी, रखडलेली विकास कामे आणि शिवसेना मंत्र्यांच्या विरोधात असलेली नाराजी याविषयावर आमदारांनी आपले म्हणणे उद्धव ठाकरे यांच्या समोर मांडले. शिवसेनेचे मंत्री वगळून इतर सुमारे 38 आमदारांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. शिवसेना आमदारांच्या मतदारसंघातली विकासकामे होत नाहीत. राज्यात नुकत्याच झालेल्या महापालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिवसेना आमदारांना शिवसेना मंत्र्यांकडून कोणतीही मदत झाली नाही अशी तक्रार देखील शिवसेना आमदारांनी केली आहे. शहरी भागातील मंत्री ग्रामीण भागात फिरकत नाहीत. ग्रामीण भागातील आमदारांना विकासकामे करण्यासाठी किंवा इतर कुठलीच मदत करत नाहीत,  अशी तक्रार देखील आमदारांनी केल्याची माहिती मिळत आहे. 

शिवसेनेच्या आमदारांना विकासनिधी देखील भाजपा आमदारांच्या तुलनेत कमी मिळतो अशी तक्रार शिवसेना आमदारांनी केली आहे. शिवसेना आमदारांची कामे व्हावीत यासाठी येत्या दोन ते तीन दिवसांत मुख्यमंत्र्यांना भेटून शिवसेना आमदारांची विकासकामे मार्गी लावू असे अाश्वासन उद्धव ठाकरे यांनी आमदारांना दिले आहे. तसेच शिवसेनेच्या मंत्र्यांकडून जर शिवसेना आमदारांची कामे होत नसतील तर संबंधित मंत्री, आमदार आणि उद्धव ठाकरे स्वतः अशी बैठक लावून आमदारांचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

बैठक संपल्यावर शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी पत्रकारांना सांगितले की विधिमंडळ सुरू असताना उद्धव ठाकरे दरवर्षी आमदारांची भेट घेत असतात. शिवसेनेच्या आमदारांच्या मतदारसंघातील अनेक गोष्टी उद्धव ठाकरेंसमोर मांडल्या आहेत. तसंच शेतकरी कर्जमुक्तीबाबत आणि सर्वंकष विकासाबाबतची चर्चा आमदारांच्या कामाचा अंतर्भाव अर्थसंकल्पात केला जावा यासाठी चर्चा करण्यात आली. बजेटपूर्वी कर्जमुक्तीचा निर्णय घ्यावा यासाठी आमदार आग्रही आहेत. तसेच आमदारांनी शेतकरी कर्जमाफीबाबत आक्रमक राहावे असे आदेश उद्धव ठाकरे यांनी आमदारांना दिले आहेत.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा