कुमारस्वामींच्या शपथविधीला उद्धव ठाकरे जाणार नाहीत!


  • कुमारस्वामींच्या शपथविधीला उद्धव ठाकरे जाणार नाहीत!
SHARE

कर्नाटकमध्ये भाजपाच्या नाकावर टिच्चून काँग्रेस-जेडीएस आघाडीचं सरकार स्थापन होणार आहे. आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून एच. डी. कुमारस्वामी शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्यासाठी विविध राजकीय पक्षांच्या नेतेमंडळींना निमंत्रण पाठवण्यात आलेलं आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. मात्र, निमंत्रण पाठवूनही शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे या सोहळ्याला उपस्थित राहणार नाही आहेत. त्यामुळे आता राजकीय चर्चांना उधाण आले आहे.


येडियुरप्पा झाले पायउतार

कर्नाटक निवडणुकांमध्ये भाजपाला १०४ जागांवर विजय मिळाला. तर काँग्रेसला ७८ आणि जनता दल सेक्युलर पक्षाला ३७ जागांवर विजय मिळाला. निकाल लागल्यानंतर लागलीच काँग्रेस-जेडीएसने आघाडी करत सत्ता स्थापनेसाठी दावा केला. मात्र, कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला यांनी भाजपाला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिलं. याविरोधात काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर निर्णय त्यांच्या बाजूने लागला आणि येडियुरप्पांना मुख्यंमत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला.


एच. डी. कुमारस्वामी


विरोधक एकवटले?

भाजपाच्या विजयवारूला रोखण्यासाठी देशातील विरोधी पक्ष एकवटल्याचं चित्र सध्या दिसत आहे. त्यामुळे कुमारस्वामींच्या शपथविधीला मोठमोठ्या नेत्यांची उपस्थिती अपेक्षित आहे. मात्र, या यादीमध्ये शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचं नाव नसेल. कुमारस्वामी यांचं निमंत्रण येऊनही उद्धव ठाकरेंनी शपथविधीला उपस्थित राहण्यास नकार दिला आहे.


पालघर निवडणूक प्रचाराचं कारण

यावर बोलताना, "एचडी कुमारस्वामी यांच्या शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण शिवसेनेला आलेलं आहे. देवेगौडा यांनी स्वत: उद्धव ठाकरेंना निमंत्रण दिलं आहे. मात्र, आमच्याकडून या सोहळ्याला कुणीही उपस्थित राहणार नाही. पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेते पालघर निवडणुकीच्या प्रचारामध्ये व्यस्त आहेत", अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार आणि राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनी दिली.


भाजपमुळेच शिवसेनेची गैरहजेरी?

शिवसेनेकडून पालघर प्रचाराचं कारण पुढे केलं जात असलं, तरी उद्धव ठाकरेंचं सोहळ्याला न जाण्यामागे वेगळंच कारण असल्याची चर्चा सुरू आहे. कर्नाटकमध्ये भाजपला मागे सारून काँग्रेस-जेडीएस आघाडीचं सरकार स्थापन होत असल्यामुळेच उद्धव ठाकरेंनी या सोहळ्याला गैरहजर रहाण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे.


देशभरातील दिग्गज राहणार उपस्थित

या सोहळ्याला माकपचे महासचिव सीताराम येचुरी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, बसपाच्या सर्वेसर्वा मायावती, पश्चिम बंगालच्या मुख्यंमत्री ममता बॅनर्जी, केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन, सपा अध्यक्ष अखिलेश यादव, आरजेडी नेते तेजस्वी यादव, आन्ध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, आरएलडीचे प्रमुख अजित सिंह, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी, अभिनेता कमल हसन, पंजाबचे मुख्यंमंत्री कॅ. अमरिंदर सिंह आणि ओरिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक आदी दिग्गज नेतेमंडळी सहभागी होण्याची शक्यता आहे.हेही वाचा

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना दाखवला बेईमानीचा आरसा


संबंधित विषय
ताज्या बातम्या