दोन दिवसांच्या अयोध्या दौऱ्यासाठी पोहोचलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं अयोध्येत शिवसैनिक, साधू-महंत आणि हिंदूत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांकडून अत्यंत जोरदार स्वागत झालं. लक्ष्मण किला इथं विधीवत संकल्प पूजा केल्यानंतर उद्धव यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावरून मोदी सरकारवर तिखट शब्दांत टीका केली. पहले मंदिर, फिर सरकार असं म्हणत राम मंदिराच्या मुद्द्यावर सरकार स्थापन करणाऱ्या भाजपा सरकारला उद्धव यांनी राम मंदिर बांधण्याची तारीख सांगण्याचं आव्हान दिलं.
दुपारी दीड वाजता फैजापूर विमानतळावर आगमन झाल्यावर खा. संजय राऊत, मिलिंद नार्वेकर, अनिल देसाई, चंद्रकांत खैरे, एकनाथ शिंदे या शिवसेनेच्या नेत्यांनी त्यांचं ढोल-ताशांच्या गजरात स्वागत केलं. यावेळी विमानतळाबाहेर शिवसैनिकांची मोठी गर्दी झाली होती. तिथून पुढे उद्धव पत्नी रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासोबत पंचवटी अतिथीगृहात गेले.
तिथून तयारी करून ते ४ वाजता लक्ष्मण किला इथं पोहोचले. कार्यक्रमस्थळी मोठ्या प्रमाणात शिवसैनिक, साधू-महंत आणि हिंदूत्ववादी कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. याठिकाणी उद्धव यांनी सहकुटुंब गौरी पूजन, गणेश पूजन आणि शिवनेरीची माती असलेलं कलश पूजन केलं. संकल्प पूजेनंतर उद्धव यांनी उपस्थित प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींसमोर आपल्यावरील टीकेला चोख उत्तर दिलं.
भाजपाने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीआधी राम मंदिराचा मुद्दा जोरदारपणे उचलला होता. पण सत्तेत येऊन साडेचार वर्षे झाली तरी भाजपाने मंदिर उभारण्यासाठी कुठलीही पावलं उचलली नाहीत. त्यामुळे आता किती सहन करायचं असा मुद्दा उपस्थित करून राम मंदिर उभारण्याची तारीख सांगण्याचं आव्हान भाजपाला दिलं.
यानंतर उद्धव यांनी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास शरयू नदीकिनारी संत-महंत आणि शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थित महाआरती केली. यावेळेस मुंबईसह महाराष्ट्रातील मंदिरांमध्ये शिवसेनेकडून महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली. यांत मुंबईचे डबेवाले देखील सहभागी झाले होते.
उद्धव रविवारी सकाळी रामलल्लाचं दर्शन घेऊन दुपारी ३ वाजता मुंबईच्या दिशेने निघतील.
हेही वाचा-
Live Updates: राम मंदिर उभारण्याची तारीख सांगा, उद्धव यांचं भाजपाला अल्टिमेटम