Advertisement

'मोदींचे मयत' दै.'सामना'त 'सरकारचे मयत' कसे झाले?


'मोदींचे मयत' दै.'सामना'त 'सरकारचे मयत' कसे झाले?
SHARES

आत्मस्तुतीच्या असो वा परनिंदेच्या, घोषणा देण्यात शिवसैनिकांचा हात (तोंड) कुणीही धरु शकत नाही. शिवसैनिकांनी वेळोवेळी जन्माला घातलेल्या घोषणांशिवाय महाराष्ट्राचा गेल्या 50 वर्षांचा इतिहास लिहिता येणं अशक्य आहे. त्यातल्या अनेक घोषणांमध्ये काही किरकोळ बदल करुन किंवा काहीतर जशाच्या तशा आता सर्वच राजकीय पक्ष वापरतात. असं असलं तरी अनेक घोषणांचा मूळचा काॅपीराईट-स्वामीत्वहक्क हा शिवसैनिकांकडेच आहे आणि याबाबत कुठलाच वाद असू नये. विशेष म्हणजे, अनेकदा या घोषणा म्हणजे दुस-या दिवशीच्या दै. सामनातील बातम्यांचे ठळक मथळे असतात !

शनिवारी मुंबईत ठिकठिकाणी शिवसेनेने महागाईविरोधात आंदोलनं करुन नरेंद्र मोदींच्या भाजप सरकारचा निषेध केला. या मोर्चांमध्ये युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यापासून शिवसेनेचे अनेक नेते, खासदार, आमदार, वरिष्ठ पदाधिकारी आणि अर्थातच शिवसैनिकही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. "प्रधानमंत्री की ‘मन की बात’… बोलाचीच कढी, बोलाचाच भात", ‘नहीं चाहिये अच्छे दिन; कोई लौटा दे मेरे बीते हुए दिन’, ‘नको तो गॅसचा नखरा, बाई आपला चुला बरा’, ‘बहुत हुई पेट्रोल-डिजल के महंगाई की मार, अब उखाड के फेक दो भाजप सरकार’ अशा अनेक घोषणा हे आंदोलन करताना शिवसैनिकांनी दिल्या.

पण सर्वात लक्षवेधी (आणि तितकीच धक्कादायक) घोषणा होती ती - "एवढी गर्दी कशाला, मोदींच्या मयताला"!



"एवढी गर्दी कशाला, मोदींच्या मयताला" या घोषणेला प्रचंड बातमीमूल्य असल्यामुळे शिवसेनेचा महागाईविरोध राहिला बाजूला, वृत्तवाहिन्यांनी शिवसेनेच्या मोदीविरोधावरच बातम्या चालवल्या. सोशल मीडियावरही या घोषणेचे पडसाद क्षणार्धात उमटले. फेसबुकवर बहुतेकांनी या घोषणेला 'अनलाईक' केलं. पंतप्रधानपदावर विराजमान व्यक्तीविरोधात अशी घोषणा देणं हे मोदी-भाजपभक्तांनाच नव्हे, तर अगदी भक्तविरोधकांनाही रुचलं नाही.

ही घोषणा अनैतिक, अशोभनीय आहे, अशी टीका सर्वांनीच केली. पंतप्रधानपदाचा अपमान जसा या घोषणेमुळे होत होता, तसा शिवसेनेचा दुतोंडीपणाही समोर आला होता. भाजपच्या केंद्र आणि राज्य अशा दोन्ही सरकारांमध्ये सहभागी असलेल्या शिवसेनेने ही घोषणा देणं खरोखरच हास्यास्पद होतं.

त्यासंदर्भात काल रविवारी अहमदनगरच्या एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी "महागाईच्या विरोधात शिवसेनेने केलेलं आंदोलन अभिनंदनीय असलं तरी सत्तेत राहून सेनेने अशी भूमिका घेणं बरं नाही. एकतर परिस्थिती सुधारण्याचा (म्हणजे सरकारच्या निर्णयांवर प्रभाव टाकण्याचा) त्यांनी प्रयत्न करायला हवा, नाहीतर (सरकारमधून बाहेर पडून) पूर्णपणे रस्त्यावर तरी उतरायला हवं" असं मत व्यक्त केलं. असो.

शिवसैनिकांनी शनिवारी आंदोलन करताना दिलेली "एवढी गर्दी कशाला, 'मोदीं'च्या मयताला" ही घोषणा रविवारच्या दै. सामनाच्या पहिल्या पानावर असायला हवी होती. पण बहुदा ती प्रभादेवीच्या नागू सयाजी वाडीतील 'सामना' कार्यालयापर्यंत पोहोचण्याआधीच हवेत विरली !


त्यामुळे सामनाच्या पान एकवर "एवढी गर्दी कशाला, 'सरकार'च्या मयताला" ही घोषणा झळकली !!

'मोदींचे मयत' जगातील सर्वाधिक चर्चिल्या जाणा-या दैनिकात 'सरकारचे मयत' बनले !



असं का झालं असेल ?

शिवसैनिकांनी घोषणा दिल्या, त्या घोषणा देतानाचे व्हिडीओ वृत्तवाहिन्यांवर दाखवले गेले (आजही ते आॅनलाईन उपलब्ध आहेत), त्यावर इतर सर्व दैनिकांनी रविवारच्या अंकात बातम्या केल्या, मग शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दै. सामनानेच नेमकी ही घोषणा का वगळली ?

नुसती वगळली नाही, तर चक्क बदलली !

राजकारणात 'जर-तर'ला स्थान नसते, हे मान्य.

पण.. शिवसेनाप्रमुख आणि दै. सामनाचे 'संस्थापक-संपादक' बाळासाहेब ठाकरे आज 'जर' हयात असते 'तर' रस्त्यावरील आंदोलनात शिवसैनिकांनी दिलेली घोषणा शिवसेनेच्याच मुखपत्रात अशा पद्धतीने बदलली गेली नसती. रस्त्यावर उतरणा-या शिवसैनिकांमध्ये मोदींविरोधात लढण्याची (किमान आक्रमक-शिवराळ घोषणा देण्याची) हिंमत आहे, पण शिवसेनेच्या पक्षप्रमुखांमध्ये - दै. सामनाच्या संपादकांमध्ये ही हिंमत नाही, असा स्पष्ट अर्थ 'मोदी-मयत ते सरकार-मयत' या नामांतरातून निघतो ! नाही म्हणायला, 'कार्यकारी संपादक' अधूनमधून त्यांच्या लेखणीच्या बेटकुळ्या दाखवत असतात, पण 'भिऊ नकोस, मी तुझ्या पाठिशी आहे' असं म्हणणारा 'संपादक-साहेब'ही लागतोच की !!

पूर्वी बाळासाहेबांच्या आदेशाने शिवसैनिक एखाद्या मुद्यावरुन 'मुंबई बंद' करायचे.

आता 'मुंबई बंद' होते ते फक्त 'नऊ किलोमीटर लांबीच्या ढगामुळे' अर्थात पावसामुळे !

शनिवारी रस्त्यावर उभं राहून जोरजोरात 'ती' घोषणा देणा-या शिवसैनिकांच्या मनात "भाजपशी 'सामना' करायला बाळासाहेबच हवे होते" असा विचार नक्कीच आला असेल!



हेही वाचा - 

मोदीपर्वाच्या अंताची सुरुवात सोशल मीडियावरच!


Disclaimer: The views and opinions expressed in this article are those of the authors and do not necessarily reflect the official policy or position of Mumbai Live.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा