SHARE

मुंबईच्या प्रस्तावित विकास आराखड्याला असलेला शिवसेनेचा विरोध आता जोर धरू लागला आहे. हा प्रस्तावित आराखडा महापालिकेत आल्यास पुढे ढकलण्याची रणनिती शिवसेनेने आखल्याची माहिती सूत्रांनी दिली असून यामुळे राज्य सरकारची डोकेदुखी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

मुंबईच्या विकास आराखड्याबाबत प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने शिवसेनेने मुंबईतील नगरसेवकांसाठी एका शिबिराचे नुकतेच आयोजन केले होते. या शिबिरात नगरसेवकांना मार्गदर्शन करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई विकास आराखड्यात जर भूमीपुत्रांना न्याय मिळणार नसेल, तर विकास आराखड्याला विरोध करणार अशी ठोस भूमिका घेतली होती. त्यानंतर आता हा प्रस्तावित विकास आराखडा महापालिकेत येईल, तेव्हा पुढे ढकला, असे निर्देश त्यांनी मुंबई महापालिकेतील शिवसेना नगरसेवकांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मुंबईतील शिवसेनेच्या नगरसेवकांनी आपल्या वॉर्डामधील प्रस्तावित विकास आराखड्याचा अभ्यास करून ऑनलाईन आक्षेप नोंदवावेत, याउद्देशाने या लोकप्रतिनिधी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यासंदर्भातील प्रशिक्षणही नगरसेवकांना देण्यात आले.

विकास आराखडा आणि जीएसटी या मुद्द्यांवर शिवसेनेने भाजपाच्या विरोधात दंड थोपटले असल्यामुळे दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये आता नवीन संघर्ष रंगणार असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या