मुंबईतील (mumbai) दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानाजवळ असलेल्या मीनाताई ठाकरे (शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी) यांच्या पुतळ्यावर काही समाजकंटकांनी रंग फेकल्याचा दावा शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) केला आहे.
या घटनेनंतर दादरच्या (dadar) छत्रपती शिवाजी महाराज पार्क (shivaji park) परिसरात शिवसैनिक जमले होते. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक आमदार महेश सावंत आणि खासदार अनिल देसाई घटनास्थळी पोहोचले. यावेळी खासदार अनिल देसाई यांनी माध्यमांशी संवाद साधला.
ठाकरे गटाचे सचिव मिलिंद नार्वेकर, खासदार अनिल देसाई यांनी परिसराची पाहणी केली. उद्धव ठाकरेंनाही या प्रकरणाची माहिती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे 'शिवतीर्थ' निवासस्थानापासून हाकेच्या अंतरावरच मीनाताई ठाकरे (meenatai thackeray) यांचा पुतळा आहे.
अनिल देसाई म्हणाले, “काही गैरकृत्य करणाऱ्यांनी पुतळ्यावर रंग फेकला आहे. कदाचित या भित्र्यांना शिस्त लावण्यात आली नसेल. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. अशा घटना पाहिल्यानंतर पोलिस यंत्रणा काय करत आहे? सरकार काय करत आहे? हे प्रश्न उपस्थित होतात. या घटना निषेधार्ह आहेत. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात सरकार अपयशी ठरत असल्याचे दिसून येते.
खासदार अनिल देसाई म्हणाले, “आम्ही शिवसेना (यूबीटी) प्रमुख उद्धव ठाकरे यांना या घटनेची माहिती दिली आहे. आम्ही ही घटना आमच्या पद्धतीने हाताळत आहोत. अशा समाजकंटकांना आणि भित्र्यांना योग्य उत्तर दिले जाईल. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. आम्ही पुतळ्याभोवती असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील फुटेज तपासत आहोत. अशा घटना पाहून वारंवार वाटते की मुंबई (mumbai) सुरक्षित नाही. या घटना घडत असताना पोलिस काय करत आहेत?
शिवाजी पार्कसारख्या सकाळीही गजबजलेल्या परिसरात, पोलीस बंदोबस्त असलेल्या भागात हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या भागात अनेक जण मॉर्निंग वॉकला येतात, जवळच बालमोहन विद्यामंदिर ही शाळा आहे, त्यामुळे या भागात लोकांची वर्दळ असते.
हेही वाचा