Advertisement

ठाकरी बाणा दाखवा!

किमान समान कार्यक्रम वगैरे बाजूला ठेवून या ठाकरे सरकारने 'ठाकरी बाणा’ दाखवावा अन्यथा येणारा काळ कठीण आहेच!

ठाकरी बाणा दाखवा!
SHARES

कोरोनाने अखंड वाहणाऱ्या मुंबईला चाप लावला आणि आजवर मुंबईचा जो न थांबण्याचा लौकिक होता, तो धुळीस मिळाला. मुंबईकर आणि त्यांची जीवाची मुंबई ही देशातच नव्हे जगभरात चर्चेचा विषय होती ती तिच्या सतत कार्यरत राहण्याच्या शैलीमुळे. कोरोनाने नेमकी तीच ओळख पुसण्यास हातभार लावला आणि मुंबईला तिच्या मर्यादा दाखवून दिल्या.

आता याला जबाबदार कोण, हे विचारले तर आम्ही एका विशिष्ट पक्षाला टार्गेट करतोय किंवा एखाद्या पक्षाची सुपारी घेऊन लिहितोय, असा आरोप करायला पेड ट्रोलर्स तयार असतातच. पण, आता आम्ही मुंबईला आणि मुंबईकरांनाच याबाबत दोष देतोय. कारण, आम्हीच मूर्ख आहोत की अशा नेत्यांना निवडून देतोय की ज्यांना किमान राजकारण तरी कधी करायचे आणि कधी नाही, हेच कळत नाही. केवळ मुलाखती देऊन परिस्थिती सावरता येत असती तर पंतप्रधानांना कोरोनाच काय चीन, पाकिस्तानलाही सहज हरवता आलं असतंच की… भाषणबाजीत त्यांचा हात तर कोणीच धरू शकत नाही ना?

जाऊ देत, सध्या आपण मुंबईचा विचार करू. तर, त्या कोरोनाने मुंबई परिसरात राहायचे ठरवले असेल तर आम्ही काय करायचे? सध्याचे तीन चाकी सरकार तर इतके संभ्रमित आहे की सर्व दोषसुद्धा कोरोनालाच दिले तरच अधिक योग्य ठरेल. आणि, मुंबई महापालिकेबद्दल तर काही बोलायचेच नाही. कारण, ज्या महापालिकेत रस्ते बांधण्याबरोबरच रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी वार्षिक बजेट असेल अशा जगातील कदाचित एकमेव महापालिकेचा कारभार म्हणजे 'रामराज्य'च नाही का? करदात्यांचे सुमारे ३५० कोटी दरवर्षी खड्ड्यात घालण्याचे पुण्य जेथे होते तेथील रस्ते किती पावन असतील? पावसाळ्यात तर दरवर्षी पॉटहोल्समुळे पालिकेची पोलखोल होत असली तरी आम्ही काही बोलायचे नाही… नाहीतर सुपारीबाज पत्रकारितेचा ठपका लावण्यासाठी सुपारी देऊन ठेवलेले आहेतच.

सध्या मुंबईत कोरोना कागदावरच दिसतोय. प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच आहे. कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी चीनच्या धर्तीवर तत्काळ बांधलेली बीकेसी, गोरेगाव एनईसी कपाऊंडमधली रुग्णालये आता रिकामी होऊ लागली आहेत. म्हणजे ती भरली कधी होती, हा प्रश्न विचारायचासुद्धा नाही. कोट्यवधी रुपये खर्च केले पण सुविधा का मिळत नाहीत, हेसुद्धा विचारले तर पाप! कारण, आता कोरोनाग्रस्तांना इतक्या झटपट सेवा मिळत आहेत की मुंबईचं कौडकौतुक खुद्द डब्ल्यूएचओनेच केलंय. आपल्या मुख्यमंत्र्यांचंही बरं का! त्यामुळे, आपण आता जवळपास विजयीच झालो आहोत. फक्त मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे जेव्हा या विजयीश्रीची घोषणा करतील तेव्हाच ती खरी असेल. तोपर्यंत तुम्ही कौतुक म्हणूनही बोलू नये, अशी विनंती त्यांनीच मुलाखतीतून केली आहे बरं!

काही दिवसांपूर्वी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत त्यांच्या बंधूंवर म्हणे अप्रत्यक्ष टीका केली. ते म्हणाले की, मुख्यमंत्री मला बाहेर दिसलेच नाहीत. घरातच असतात. त्यानंतर त्यांनी तर कहरच केला. रुग्णालये उभारता पण डॉक्टर, नर्सेस आहेत की नाहीत याचा विचार न करता करोड़ों रुपये कसे खर्च करता? असा रोकड़ा सवालच ठाकरेंनी ठाकरेंनाच विचारला. मुंबईतून जीव घेऊन पळालेले परप्रांतीय आता पुन्हा जथ्याने परतू लागलेत. त्यांना बिनबोभाट प्रवेश आणि कोकणातून किंवा राज्यातल्याच अंतर्गत जिल्ह्यातून ये-जा करायला ई-पास वगैरेसारखी बंधनं असल्यावरही राज ठाकरेंनी सवाल निर्माण केले. सरकारदरबारचा गोंधळ समोर आणला तर मनसेच्या अविनाश जाधवांची तडिपारी आणि बांद्र्याला ऐन कोरोनाकाळात गर्दी जमवण्याचा आरोप असणाऱ्या विनय दुबेंसारख्यांवर आहिस्ते चल कारवाई, हा कसला कारभार?

मुंबईचा वाली कोण?

रामायण काळाचा दाखला देणारी मुंबई सध्या स्वतःचा वाली शोधतेय. मुंबईला आजवर वाली नव्हे तर वाल्या कोळीच लाभले. ज्यांचा वाल्मिकी कधी झालाच नाही. ज्यांच्या हाती सत्ता दिली ते बदलत गेले. मराठी, मराठी करत सत्तेवर आले आणि आज केम छोचे बॅनर लावण्यापासून भगव्यावर हिरवा चाँदतारा लावण्यापर्यंतचे बदल उघड्या डोळ्यांनी पाहायला मिळालेत. माहिमच्या ‘ब ॉम्बे स्कॉटिश' शाळेच्या कोपऱ्यावर वरळीच्या दिशेने हात दाखवत 'केम छो' म्हणणारे बॅनर बदललेल्या शिवसेनेचं प्रतीक होतं, हे आता तीनचाकी रिक्षा सरकारच्या कारभारातून स्पष्ट होतंय.

दुःखद म्हणजे, ज्या बाळासाहेबांनी भगवा अंगावर ओढला त्यांच्या फोटोतूनही भगवा अंगरखा गायब करण्यापर्यंत बदललेल्या शिवसेनेची मजल गेली. अगदी हिंदूहृदयसम्राट उल्लेख करण्याऐवजी फक्त शिवसेनाप्रमुख उल्लेख करण्याचा सिलसिलाही आता कायम झालाय. मुख्यमंत्री तर किमान समान कार्यक्रमाची हमी देत खुर्चीवर बसले असले तरी आता समसमान कार्यक्रमही देताना दिसत नाहीत. ईदसाठी वेगळा न्याय आणि हिंदू सणांसाठी दुसरा, असा आरोप त्यांच्यावर सातत्याने होतोय. ईदनिमित्त कत्तलींवर नियंत्रण ठेवण्यातही नियोजनाचा अभाव, विरोधाला योग्य उत्तर देण्यात सरकार कमी पडल्याचे चित्र दिसलं. बकरे ऑनलाइन मागवले तर कापायचे कुठे, या प्रश्नाचे उत्तरच नसल्याने सावळा गोंधळ सातत्याने समोर येत राहिला. हिंदू सणांवर अंकुश पण इतरांच्या सणांवर केवळ तोंडी नियमावली, असेही आरोप होत आहेत आणि त्यात बऱ्यापैकी तथ्यही जाणवते. आजही मुंबईच्या मुस्लीमबहुल भागात मास्कचा वापर होताना दिसत नाही, दुचाकींवर डबलसीट सोडा ट्रिपल सीट फिरण्यापासून सर्व प्रकारच्या नियमांचे सर्रास उल्लंघन होताना दिसते आणि तिथे पोलिसही कारवाई करत नाहीत. पण, हेच जर इतर भागात आढळले तर?

उद्धवसाहेब, तुमच्या किमान समान कार्यक्रमात या बाबी आहेत का? नसतील तर घ्या आणि सुधारा की मुंबईची अवस्था!

आज आम्ही मास्क न लावता हे बोलतोय म्हणून आमची तोंडं दिसतात. पण, आजवर तुम्हीसुद्धा हेच बोलत होतात ना? मग आज काय बदललंय असं की हातात सत्ता असूनही तुम्ही गप्प आहात?

तुमचे बंधू राज ठाकरे म्हणाले की परप्रांतीयांना परत घेताना रजिस्टरमध्ये एंट्री करा. आज बहुतांश परतले असले तरी तुम्ही सरकार म्हणून काहीच भूमिका घेताना दिसले नाहीत. आज एपिडेमिक अॅक्ट लागू आहे, त्यामुळे सर्वाधिकार मुख्यमंत्र्यांजवळ आहेत. मग, काही कठोर निर्णय घेऊन टाका आणि शिवसेनेचं खरं रुप (हिंदुत्वाचे) ठळकपणे दाखवण्याची संधी  साधा की जरा!

किमान समान कार्यक्रम म्हणजे निर्णयच न घेणे असे तर नाही ना?कारण तुम्ही ज्या मित्रपक्षांच्या मैत्रीचे हवाले देत असता ते तर तुमच्याबद्दल जाहीर आणि खाजगीत तर अधिकपणे तक्रारी करत राहतात.

मुंबईबद्दल तरी निर्णय घेताना तुम्ही अधिक सक्रीय आहात, असे सांगितले जाते. ठप्प झालेली मुंबई तुम्ही टप्प्याटप्प्याने सुरू करत  आहात. पण, तुमचे टप्पेच कोणाला कळत नाहीएत. म्हणजे, सामान्य मुंबईकरांना तर सोडाच पण तुमच्या प्रशासनालाही कळेनासे झालेय. आता जिम सुरू करण्याचे सूतोवाच पूर्वीच केले होते. पण अजूनही तुम्ही मोकळ्या जागेवरील जिम वगैरे बोलत आहात. मॉल सुरू करायला परवानगी देताय पण जिम आणि इतर बाबींबद्दल चित्र स्पष्ट होत नाहीये.

कोरोनाची आकडेवारी कमी होतेय, जास्त होतेय यापेक्षाही आता उद्धवसाहेब तुमच्या अवतीभोवतीचे राजकारण अधिक किचकट होत चाललंय, हे लक्षात घ्या. ज्या काकांच्या आशीर्वादाच्या भरवंशावर तुम्ही मुलाखती देत सुटला आहात, त्याच काकांचा इतिहास लक्षात ठेवा आणि बाळासाहेब ठाकरे काय म्हणत त्यांच्याबद्दल तेही लक्षात घ्या! काँग्रेसला तर रिक्षात बसण्यापेक्षा मर्सिडीजची सवय आहे. आणि, रिक्षा ही शॉर्ट डिस्टन्ससाठीच वापरले जाणार वाहन आहे हेही लक्षात घ्या!

मुंबईला वाचवा!

महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी हा लौकिक असणाऱ्या मुंबईला आता मुख्यमंत्रीच वाचवू शकतात. कारण, गेल्या २० वर्षांहून अधिक काळाची सत्ता तुम्हाला मुंबईची नाड़ी ओळखण्यासाठी पुरेशी आहे. आज ज़र मुंबईसाठी विशेष पावले उचलून उपाययोजना केल्या नाहीत तर मुंबईचं पूर्वीचं वैभव मिळवणं कठीण होणार आहे. तेव्हा, किमान समान कार्यक्रम वगैरे बाजूला ठेवून या ठाकरे सरकारने 'ठाकरी बाणा’ दाखवावा अन्यथा येणारा काळ कठीण आहेच!


हे लेख देखील वाचा-

कोरोना चालेल, राजकारण नको!

विनाशकाले 'विकृत' बुद्धी...




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा