Advertisement

मोदीपर्वाच्या अंताची सुरुवात सोशल मीडियावरच!


मोदीपर्वाच्या अंताची सुरुवात सोशल मीडियावरच!
SHARES

लोकसत्ताचा आजचा  अग्रलेख, सोशल मीडियावरील काही तरुणांना सायबर सेलने नोटिसा बजावून काल नोंदवलेले त्यांचे जबाब आणि परवा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्रभाई थापा व भाजप सोशल मीडियावर केलेली टीका या तीन वेगवेगळ्या बिंदूंना एकत्र जोडण्याचा प्रयत्न केला तर जे चित्र समोर येतंय, ते निश्चितच भयावह आहे.


पहिला बिंदू

लोकसत्ताचे आजचे संपादकीय 'मारिच माया' हे जरी मेक्सिकोतल्या भूकंपाच्या निमित्ताने लिहिलं गेलं असलं तरी त्यात मांडलेला विचार हा जसाच्या तसा आपल्या देशाला आणि विशेषत: राज्यालाही लागू होतो, हे विशेष ! लोकसत्ताकार म्हणतात, "एक ‘अवस्तुनिष्ठ वस्तुस्थिती’ आपल्यासमोर मांडण्याचे प्रयत्न विविध प्रकारे सुरू आहेत. कधी ती समाजमाध्यमांतील बनावट चित्रफितींतून आपल्यासमोर येते, तर कधी मुख्य प्रवाहातील माध्यमांतील सरकारी आकडेवारीमधूनही. ही माहिती नियंत्रित करून वस्तुस्थिती हवी तशा प्रकारे ‘फिरवण्या’चा, मिथ्यांचे मॅट्रिक्स उभे करण्याचा डाव आहे. "


नरेंद्रभाई थापा आणि भाजपने राजकारणासाठी तसंच प्रत्यक्ष निवडणुका जिंकण्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करुन असेच मिथ्यांचे मॅट्रिक्स उभे केले. त्यांचा हा डाव यशस्वीही झाला. प्रचार करताना त्यांनी सोशल मीडियावर कधीही स्वत:चा ओरिजिनल विचार मांडला नाही. उलट त्यांचा भर कायमच त्यांचे विरोधक- सोनिया गांधी, राहुल गांधी, पंतप्रधान मनमोहन सिंग आणि इतर नेत्यांचं चारित्र्यहनन करण्याचाच होता. मुस्लिम समाजाविषयी प्रचंड खोटारडा प्रचार करुन हिंदू समाजाला सोशल मीडियाद्वारे त्यांनी चुचकारलं. त्यांच्या सुदैवाने काॅंग्रेसकाळातली भ्रष्टाचाराची प्रकरणं त्यांच्या मदतीला आली. ब्रिटिश लोक जसे भारतात 'व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले', तसंच भाजपवाले 'भ्रष्टाचारविरोधी म्हणून आले आणि तेच आज अभिव्यक्तीस्वातंत्र्यविरोधी बनले' आहेत!

नोटाबंदीनंतर आरबीआयने काळ्या पैशाविषयी जाहीर केलेले आकडे पाहिले तर लोकसत्ताकारांचा "नियंत्रित माहितीद्वारे एक सोनेरी मृग आपल्याला दाखविण्यात येतो. आपण त्या भ्रमजालातच अडकतो. नंतर नंतर तो मारिच असल्याचे उघड झाले तरी काही बिघडत नसते. कारण एकदा नागरिकांचा एकूणच तथ्यांवरचा विश्वास भुईसपाट झाला, की मग ज्याच्या हाती सत्ता त्याचेच खरे हा नियम लागू होतो" हा मुद्दा पुरेसा स्पष्ट होतो.


दुसरा बिंदू

विरोधकांचं चारित्र्यहनन हा भाजपवाल्यांच्या शुद्ध चारित्र्याचा एकमेव पुरावा आहे !

खरंतर, 'मी नाही त्यातली, कडी लाव आतली' ही आपली मराठी म्हण या कमळाबाईने स्वत:चं ब्रीदवाक्य म्हणून जाहीर करायला हवी.

विरोधकांना उठता बसता खोटं ठरवणारे भाजपचे सगळे गोबेल्स आता हळूहळू नागडे होऊ लागले आहेत.

डाॅ. विनय काटेंप्रमाणे 'राजा नागडो छे' असं कुणी म्हणू नये, इतक्यासाठीच त्यांचा सगळा खटाटोप सुरु आहे.

म्हणूनच आता गुजरातमधल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काॅंग्रेसकडून भाजपवर सोशल मीडियावर प्रभावीपणे टीका होऊ लागल्यावर अमित शहा म्हणतात की, "सोशल मीडियावर विश्वास ठेवू नका!" याहून मोठा विनोद तो कोणता ?

नेमका हाच मुद्दा पकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी परवा "नरेंद्र मोदींचं आडनाव थापा असायला हवं होतं" अशी टीका केली आणि काही वेळातच फेसबुक, ट्विटरवर नरेंद्र मोदी हे कायमचे नरेंद्रभाई 'थापा' बनले. याच भाषणात राज ठाकरे यांनी ट्विटरवरचे फेक फाॅलोवर्स, मेकइनइंडिया, पटेलांच्या पुतळ्यासाठी गोळा केलं गेलेलं लोखंड, प्रत्येकाला 15 लाख रुपये, डिमाॅनेटायजेशन, बुलेट ट्रेन अशा अनेक विषयांच्या निमित्ताने मोदी-शहा यांच्यावर तोफ डागली. दोन वर्षात 33 हजार विहिरी खोदल्याचं सांगणा-या मुख्यमंत्री फडणवीसांवरही त्यांनी टीका केली.

पण या संपूर्ण भाषणात राज यांनी जो सिक्सर मारला तो होता, "हगलेलं तरंगतंच" हे त्यांचं वाक्य !  

मला नाही वाटत की, भाजपवर किंवा नरेंद्रभाई थापा यांच्यावर राज यांच्याइतकी स्पष्ट, प्रभावी आणि रांगडी टीका आजवर कुणीही केली असेल.


भक्तांनी सोशल मीडियावर 'हगलेलं' सर्वात आधी पुराव्यांनिशी निदर्शनास आणून दिलं ते पत्रकार स्वाती चतुर्वेदी यांनी 'आय अॅम अ ट्रोल' या पुस्तकाद्वारे! या पुस्तकानंतर मोदींच्या, भाजपच्या सोशल मीडिया सेलवर चहुबाजूंनी टीका होऊ लागली. बरं, ही टीका काही फक्त एकाच पक्षाचे किंवा एकाच विचारधारेचे लोक करताहेत, असं नाही. वेगवेगळ्या राजकीय विचारधारांशी संबंधित असलेले अनेकजण आज नरेंद्रभाई थापांवर टीका करताना दिसताहेत. सर्वात मुख्य म्हणजे, ज्या भाषेत आणि ज्या पद्धतीने भक्तांनी विरोधकांवर टीका केली होती, त्याच प्रकारच्या भाषेत आणि पद्धतीने आता इतरलोक भाजप सरकारवर टीका करु लागले आहेत. आणि इथेच मोठी गडबड झाली.  


तिसरा बिंदू

देव गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांच्या ओएसडी निधी कामदार यांच्याविषयी फोटोशाॅप केलेली एक इमेज फेबुवर पोस्ट केली म्हणून कामदार यांनी सायबर सेलकडे तक्रार दाखल केली. गायकवाड यांनी निधी कामदार यांच्या फेक फेबु अकाऊंटचा स्क्रीनशाॅट काढून "फडणवीसांबाबतचं मत बदलण्यासाठी कामदार यांनी (गायकवाड यांना) पैसे आॅफर केले" अशी पोस्ट केल्याचा आरोप आहे. (Gaikwad allegedly posted a screenshot of Kamdar’s fake account, offering him money to change his opinion of Fadnavis.- आजचा 'इंडियन एक्स्प्रेस') ही तक्रार काल-परवा नाही तर जूनमध्ये दाखल करण्यात आली होती. त्यावरुन काही दिवसांपूर्वी गायकवाड-बाणगुडे यांना अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांचे फेबु फ्रेंड असलेल्या मानस पगार, आशिष मेटे, ब्रह्मदेव चट्टे, श्रेणीक नरदे, योगेश वागज, सचिन कुंभार आणि आणखी काही तरुणांना सायबर सेलने नोटिसा पाठवून जबाबासाठी बोलावून घेतले आणि एका नव्या वादाला तोंड फुटलं.

चारपाच दिवसांपूर्वी भाजपच्या काही पदाधिका-यांनी तक्रार केली म्हणून कांजूरमार्ग पोलीस ठाण्यात मनसेच्या एका स्थानिक कार्यकर्त्यालाही पोलिसांनी आयपीसी 149 ची नोटीस बजावली.


मला प्रश्न पडलाय की,

सोनिया गांधी-डाॅ. मनमोहन सिंग यांच्याविरोधात ज्या घाणेरड्या पोस्ट भक्तांनी टाकल्या होत्या, त्याविरोधात काॅंग्रेस कार्यकर्त्यांनी तक्रारी दाखल केल्यावर कुणाकुणाला अटक केली जाईल?


आमीर खान-गुल पनाग यांच्याविरोधात ज्या घाणेरड्या पोस्ट भक्तांनी टाकल्या होत्या, त्याविरोधात त्यांच्या चाहत्यांनी तक्रारी दाखल केल्यावर कुणाकुणाला अटक केली जाईल?


मुस्लीम-दलित समाजाविषयी ज्या घाणेरड्या पोस्ट भक्तांनी टाकल्या होत्या, त्याविरोधात सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रारी दाखल केल्यावर कुणाकुणाला अटक केली जाईल?


..... मुख्यमंत्र्यांच्या ओएसडी निधी कामदार यांनी आखून दिलेल्या मार्गावर चालून सर्वपक्षीय भाजपविरोधकांनी सायबर सेलकडे तक्रार दाखल केल्या तर कदाचित देशाच्या केंद्रीय मंत्रिमंडळालाच अटक करावी लागेल !



मोदीपर्वाची सुरुवात सोशल मीडियावरून झाली.

आता त्या पर्वाच्या अंताची सुरुवातही सोशल मीडियावरच होणार, हे निश्चित !



Disclaimer: The views and opinions expressed in this article are those of the authors and do not necessarily reflect the official policy or position of Mumbai Live.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा