• '...तर मी खोटं बोलत असेन'
SHARE

दादर - छोटा भाऊ म्हणून मनसे युतीसाठी तयार आहे, अजूनही वेळ गेलेली नाही, शिवसेनेने युतीच्या प्रस्तावाचा विचार करावा, अशा भावना मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केल्या आहेत.

युतीचा प्रस्ताव घेऊन रविवारी मनसेचे बाळा नांदगावकर मातोश्रीवर गेले होते. या वेळी लहान भाऊ म्हणून मनसे शिवसेनेसोबत युती करण्यासाठी तयार आहे. आमच्या प्रस्तावाचा सन्मान राखा, त्याबाबत विचार करा, अशी मागणी शिवसेनेच्या नेत्यांकडे बाळा नांदगावकरांनी केली होती. मात्र उद्धव ठाकरे यांनी कुठलाच प्रस्ताव आला नसल्याचे स्पष्ट केले. यावर जर उद्धव ठाकरे कोणताच प्रस्ताव आला नसल्याचं सांगत असतील, तर मी खोटं बोलत असेन असं सांगत, मी कधीच खोटे बोलत नाही असं नांदगावकर यांनी म्हटले.

तसेच मराठी माणसांसाठी दोन भावांनी एकत्र यावे अशी इच्छा बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केली. पण दोघा भावांना एकत्र आणण्यात यश आले नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. उद्धव ठाकरे यांनी भाजपाशी काडीमोड घेतल्यानंतर शिवसेना आणि मनसे एकत्र येणार असल्याची चर्चा रंगली होती. पण आता शिवसेना आणि मनसेची युती होण्याच्या शक्यता जवळपास संपुष्टात आल्याचीच चिन्ह आहेत.

संबंधित विषय
ताज्या बातम्या