उद्धव ठाकरे -अहमद पटेल यांची बैठक झालीच नाही; अफवा पसरवणं बंद करा - संजय राऊत

कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीशी आमचे अजूनही बोलणे चालू आहे.’ दरम्यान, काल मंगळवारी मुंबईत कॉंग्रेस-राष्ट्रवादीची बैठक पार पडली. या बैठकीमधून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन करण्यात आल्याची माहिती आहे.

SHARE

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यापासून राजकीय हालचालींचा वेग वाढला आहे. सत्तास्थापनेसाठी शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात खलबतं सुरू आहेत. या दोन्ही पक्षांची अधिकृत पाठिंब्याची पत्रके नसल्यामुळे शिवसेना सत्ता स्थापन करू शकलेली नाही. महाराष्ट्रातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी काँग्रेसचे शिष्टमंडळ महाराष्ट्रात आलं खरं, मात्र त्या शिष्टमंडळासोबत उद्धव ठाकरेंसोबत बैठक झाल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांनी चालवल्या, या बैठकीत शिवसेनेला काही आश्वासने दिली गेल्याचं म्हटलं जात आहे. मात्र यामध्ये काही तथ्य नसल्याचं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. संजय राऊत यांनी नुकतंच एक ट्वीट करत ही माहिती दिली आहे.

आपल्या ट्वीटमध्ये संजय राऊत म्हणतात, ‘अहमद पटेल यांची शिवसेना अध्यक्ष उद्धवजी ठाकरे यांच्याशी मीटिंग झाली, यामध्ये शिवसेनेला काही आश्वासने दिली गेली अशा बातम्या माध्यमांद्वारे प्रसारित केल्या जात आहेत. मात्र उद्धवजींकडून मला हे स्पष्ट करावंसं वाटतं की, अशी कोणतीही बैठक झाली नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी आमचं अजूनही बोलणं चालू आहे.’ दरम्यान, काल मंगळवारी मुंबईत काँग्रेस-राष्ट्रवादीची बैठक पार पडली. या बैठकीमधून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन करण्यात आल्याची माहिती आहे.

हेही वाचा ः- शिवसेनेनेही वारंवार मुख्यंत्रीपदाबद्दल भाष्य केलं - संजय राऊत

मुंबईतील वाय.बी. चव्हाण केंद्रात झालेल्या या बैठकीत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या व्यतिरिक्त दिल्लीचे काँग्रेसचे ३ ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे, अहमद पटेल आणि के.सी. वेणुगोपाळ देखील उपस्थित होते. बैठकीनंतर शरद पवार आणि अहमद पटेल यांनी संयुक्त पत्रकार परिषदही घेतली. याच पार्श्वभूमीवर अहमद पटेल आणि उद्धव ठाकरे यांचं बोलणं झाल्याची बातमी आली होती. मात्र ती पूर्णतः चुकीची असल्याचे स्पष्टीकरण शिवसेनेकडून देण्यात आलं आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या