प.. प.. कोणाचा... ?

मुंबईतल्या महत्त्वाच्या लोकसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ म्हणजे उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ. खरंतर कोणत्याही एका पक्षाला सलग बांधून न ठेवणारा हा मतदारसंघ. काँग्रेसने ज्येष्ठ नेते आणि अभिनेते सुनील दत्त यांची कन्या प्रिया दत्त यांना या ठिकाणाहून उमेदवारी देऊन भाजपच्या पूनम महाजन यांच्यासमोरील आव्हान वाढवलं आहे.

  • प.. प.. कोणाचा... ?
  • प.. प.. कोणाचा... ?
SHARE

मुंबईतल्या महत्त्वाच्या लोकसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ म्हणजे उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ. खरंतर कोणत्याही एका पक्षाला सलग बांधून न ठेवणारा हा मतदारसंघ. गेल्या चार ते पाच दशकातला इतिहास पाहिला तर या मतदारसंघात भाकप, जनसंघ, काँग्रेस, शिवसेना, भाजप अशा सर्वच पक्षांना संधी मिळाली होती. त्यामुळं जसा वारा बदलतो तसं पक्ष आणि उमेदवार बदलण्याची या ठिकाणच्या मतदारांची सवय आहे. त्यातच आता या विभागतली निवडणूक अधिकच चुरशीची होणार आहे. त्याचं कारणंही तसंच आहे. काँग्रेसने ज्येष्ठ नेते आणि अभिनेते सुनील दत्त यांची कन्या प्रिया दत्त यांना या ठिकाणाहून उमेदवारी देऊन भाजपच्या पूनम महाजन यांच्यासमोरील आव्हान वाढवलं आहे. यापूर्वीही प्रिया दत्त याच मतदारसंघातून निवडून आल्या होत्या. त्यामुळं त्यांना या मतदारसंघाची माहिती आहेच.

२०१४ साली संबंध नसलेला उमेदवारही लाटेत निवडणून आला होता. त्यातच मोदी लाटेत बाजी मारत आणि ‘पुण्याई’मुळंच महाजन यांनी २ लाख मतांनी प्रिया दत्त यांचा पराभव केला होता. त्यांच्या मतदारसंघात असलेल्या समस्या सोडवण्यासाठी त्यांच्याकडं आशेनं पाहिलं होतं. परंतु या मतदारसंघातल्या समस्यांचा पाढा चार-साडेचार वर्षांनंतर  आजही कायम आहे. त्यांनी आपल्या मतदारसंघाव्यतिरिक्त आपला जास्तीत जास्त वेळ दिल्लीत घालवल्यामुळे त्यांचा म्हणावा तितका संपर्क आपल्या मतदारसंघाशी राहिला नव्हता. त्यातच आता शिवसेना-भाजप युती जरी असली तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यामुळं पूनम महाजन यांच्यासाठी येती निवडणूक खडतर जाऊ शकते. 


२००५ आणि २००९ मध्ये प्रिया दत्त या याच मतदारसंघातून विजयी झाल्या होत्या. सध्या या लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी विलेपार्ल्यात भाजपाचे अॅड. पराग अळवणी, वांद्रे पश्चिममध्ये भाजपाचे मुंबई अध्यक्ष अॅड. आशिष शेलार, वांद्रे पूर्वेत शिवसेनेच्या तृप्ती सावंत, कलिनात शिवसेनेचे संजय पोतनीस, कुर्ला येथून शिवसेनेचे मंगेश कुडाळकर तर चांदिवलीतून काँग्रेसचे आरिफ नसीम खान आमदार आहेत.

या शिवसेना भाजपच्या ताब्यात विधानसभेचे अधिक मतदारसंघ असले तरी महाजन यांचा तुटलेला जनसंपर्क आणि ओसलेली मोदी लाट त्यांचीच डोकेदुखी ठरू शकते. दुसरीकडे प्रिया दत्त यांचा विचार केला तर २०१४ नंतर त्यांनीही निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे चार-साडेचार वर्षांच्या कालावधीत त्यांचाही या मतदारसंघाशी जनसंपर्क नव्हता. त्यातच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांची दत्त यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी निवडणूक लढवण्यास होकार दिला खरा, पण जनसंपर्काच्या अभावी त्यांनादेखील ही निवडणूक जिंकणं कठीण जाण्याची शक्यता आहे. 


पूनम महाजन यांच्या खांद्यावर भाजयुमोचीही जबाबदारी असल्यामुळं देशभरातील दौऱ्यांमुळे आपल्या मतदारसंघाशी त्यांची नाळ तुटली आहे. त्यातच आऊटगोईंगमुळे उमेदवार मिळत नसलेल्या काँग्रेसलाही आता पुन्हा निवडणूक लढवण्यास इच्छुक नसलेल्या प्रिया दत्त यांच्याकडंच जावं लागलं आहे. काँग्रेसकडे उमेदवार नसल्यामुळे त्यापूर्वी महाजन यांच्यासाठी ही निवडणूक सोपी होती. परंतु ऐनवेळी दत्त यांनी होकार दिल्यामुळं महाजन यांची डोकेदुखी नक्कीच वाढणार आहे. दत्त आणि महाजन या आता एकमेकांसमोर उभ्या ठाकल्यामुळं ही निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे. त्यामुळं भाजपकडून पूनम महाजन यांचं नाव आल्यास प... प... कोणाचा हे येत्या महिन्याभरातच ठरेल.
हेही वाचा -

बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाला जागा देण्याचा निर्णय योग्यच, राज्य सरकारचं न्यायालयात स्पष्टीकरण

पाॅवरहीन 'पोरखेळ'
संबंधित विषय
ताज्या बातम्या