भाजपाचा 'पारदर्शी' जाहीरनामा बनविण्यास सुरूवात

 Pali Hill
भाजपाचा 'पारदर्शी' जाहीरनामा बनविण्यास सुरूवात
Pali Hill, Mumbai  -  

मुंबई - मुंबई महापालिकेचा कारभार 'पारदर्शी' असावा अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाने घेतली असून, निवडणुकांचा जाहीरनामाही या पारदर्शी कारभाराच्या दृष्टीने तयार करण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे. शुक्रवारी या समितीची बैठक झाली. या बैठकीमध्ये जनतेच्या मनातील जाहीरनामा ही समजून घेऊन हा जाहीरनामा अधिक 'पारदर्शी' करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली विविध समित्या गठीत करण्यात आल्या असून, त्यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या जाहीरनामा समितीची बैठक दादर येथील वसंत स्मृती कार्यालयात शुक्रवारी पार पडली.

या समितीमध्ये आमदार योगेश सागर, आमदार पराग अळवणी, महापालिका गटनेते मनोज कोटक, भाजपा उपाध्यक्ष भालचंद्र शिरसाट, सरचिटणीस सुमंत घैसास, माजी आमदार अतुल शाह, माजी नगरसेवक सुनील गणाचार्य आणि समीर देसाई यांचा समावेश आहे. भाजपा महापालिका निवडणूक 'पारदर्शी' कारभाराचा अजेंडा घेऊन लढणार असे आमदार आशिष शेलार यांनी स्पष्ट केले आहे. त्यानुसार महापालिकेचा कारभार कसा पारदर्शी होईल याबाबत या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. या जाहिरनाम्याचा मसुदा पारदर्शी कारभाराचा विचार करून तयार करण्यात येत असून, तो लवकरच अंतिम केला जाईल. तसेच या जाहिरनाम्यामध्ये मुंबईकरांच्या अपेक्षा ही जाणून घेण्याचे भाजपाने निश्चित केले आहे. त्यासाठी ईमेल आणि ट्विटर वर स्वतंत्र अकाऊंट तयार केले आहे. या माध्यमातून येणाऱ्या जनतेच्या सुचना, अपेक्षा लक्षात घेऊन जाहिरनाम्याचा मसुदा अंतिम करण्यात येईल, अशी माहिती या समितीचे सदस्य भालचंद्र शिरसाट यांनी दिली. त्यासाठी तयार करण्यात आलेले ईमेल pardarshimumbai@gmail.com ट्विटर अकाऊंट @pardarshimumbai, फेसबूक Pardarshi Mumbai असे आहे, असे त्यांनी सांगितले.

Loading Comments