तर खड्ड्यांना 'करून दाखवणारे' जबाबदार - भाजपा

  Mumbai
  तर खड्ड्यांना 'करून दाखवणारे' जबाबदार - भाजपा
  मुंबई  -  

  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रस्त्यांच्या कामांसाठी आवश्यक ती साधनसामुग्री उपलब्ध करून देण्यासाठी मदत करूनही जर मुंबईच्या रस्त्यांवर खड्डे पडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी ही 'करून दाखवले' म्हणणाऱ्यांची राहील, अशा शब्दांत भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक प्रभाकर शिंदे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

  मुंबईत सध्या सुरू असलेल्या अनेक रस्त्यांची कामे ही खडी अभावी रखडली होती. याची दखल घेऊन रस्त्यांची कामे पूर्ण होण्यासाठी खडीसह आवश्यक ती सामुग्री उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहकार्य केले आहे. त्यानुसार खडी उपलब्ध झालेली आहे. त्यामुळे रस्त्यांची कामे वेळेत पूर्ण केली जावीत, अशा सूचना भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक प्रभाकर शिंदे यांनी प्रशासनाला केल्या आहेत. परंतु त्यानंतरही प्रशासन ही कामे पूर्ण करून घेणार नसेल आणि पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे पडल्यास याविरोधात भाजपा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल. मुंबईकरांना दिलासा देण्यासाठी भाजपाच्या प्रत्येक नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचे लक्ष विकास कामांवर असून, जिथे जिथे मुंबईकरांना त्रास होईल, तिथे तिथे भाजपा जनतेसाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा प्रभाकर शिंदे यांनी दिला आहे.

  विकासकामे पूर्ण करायची असली तरी या विकासकामांचे प्रस्ताव मंजूर करून त्यांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही सत्ताधारी पक्षाची असते. त्यामुळे रस्त्यांची कामे पूर्ण करण्यासाठी तसेच त्यावर खड्डे पडणार नाही याची काळजी घेण्यासाठी प्रशासनाकडून ही कामे करून घेण्याचीही तेवढीच जबाबदारी सत्ताधारी पक्षाची आहे. त्यामुळे जर मुख्यमंत्र्यांनी सर्व प्रकारची सामुग्री उपलब्ध करून देऊनही रस्त्यांवर खड्डे पडल्यास त्यांची नैतिक जबाबदारी ही 'करून दाखवले' असे म्हणणाऱ्या सत्ताधाऱ्यांची राहील, असाही टोला प्रभाकर शिंदे यांनी लगावला आहे.

  भाजपाच्या आरोपांचे महापौरांकडून समर्थन

  मुंबईतील नालेसफाईचे काम समाधानकारक होत नसल्याचे सर्वप्रथम भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी सांगितले. एवढेच नव्हे तर सफाई न झालेल्या नाल्यांचे दर्शनही घडवले. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नालेसफाई योग्य प्रकारे होत असून, शंभर टक्के नालेसफाई कधीच होत नसल्याचे सांगितले. परंतु आता खुद्द महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी प्रसारमाध्यमांपुढे नालेसफाईचे काम समाधानकारक नसल्याचे सांगत भाजपाच्या आरोपांची री ओढली आहे. हे एकप्रकारे भाजपाच्या आरोपांचे समर्थनच महापौरांनी केले असल्याचे प्रभाकर शिंदे यांनी म्हटले आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.