Advertisement

शिवसेना घरातूनच फुटली, पुतण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटाला पाठिंबा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आणखी एक झटका मानला जात आहे.

शिवसेना घरातूनच फुटली, पुतण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटाला पाठिंबा
SHARES

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना झटका देणारी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू निहार ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला पाठिंबा दिला आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटातील मुख्य शिवसेनेसाठी हा मोठा धक्का मानला जातोय.

निहार ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीचा फोटो समोर आला आहे. विशेष म्हणजे निहार हे थोड्याच वेळात माजी मंत्री उदय सामंत यांच्या बंगल्यावर अधिकृत पाठिंबा जाहीर करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

निहार ठाकरे हे उद्धव ठाकरे यांचे पुतणे आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांचे जावई आहेत. ते दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे थोरले दिवंगत चिरंजीव बिंदूमाधव ठाकरे यांचे पुत्र आहेत. निहार ठाकरे हे आता शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राजकीय कारकीर्द सुरु करणार आहेत, अशी माहिती समोर आली आहे.

"मी मुख्यमंत्र्यांना भेटलो आणि आम्ही चर्चा केली. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विचार एकनाथ शिंदे नक्कीच पुढे घेवून जातील. त्यासाठी माझ्या त्यांना शुभेच्छा आणि पाठिंबा आहे. माझी स्वत:ची लॉ फर्म आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंना जी काही लीगल मदत लागेल ती मी देईन", अशी प्रतिक्रिया निहार ठाकरे यांनी दिली.

बाळासाहेब ठाकरे यांना तीन चिरंजीव आहेत. त्यापैकी बिंदूमाधव हे थोरले चिरंजीव होते. त्यानंतर जयदेव ठाकरे हे मधले आणि उद्धव ठाकरे हे सर्वात लहान चिरंजीव आहेत. बिंदूमाधव यांचं 20 एप्रिल 1996 रोजी लोणावळा इथे एका मोटार अपघातात निधन झालं होतं. बिंदूमाधव यांच्या पश्चात त्यांचा मुलगा निहार ठाकरे हे आहेत.

निहार ठाकरे हे खरंतर व्यावसायिक आहेत. त्यांचं एलएलएमपर्यंत शिक्षण झालं आहे. पण ते आता राजकारणात जम बसवणार आहेत. त्यामुळेच त्यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. निहार हे बाळासाहेब ठाकरे यांचे सर्वात मोठे नातू मानले जातात. त्यामुळे बाळासाहेबांचे नातू निहार हे त्यांच्यासारखे राजकारणात हुकमी एक्के म्हणून नावाजले जाणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

फक्त निहार ठाकरेच नाहीत तर ठाकरे घराण्यातील बाळासाहेब ठाकरे यांच्या सून स्मिता ठाकरे यांनीदेखील एकनाथ शिंदे यांच्या गटाला पाठिंबा दिल्याची चर्चा आहे. एकनाथ शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वी स्मिता ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यामुळे स्मिता यांचादेखील शिंदे गटाला पाठिंबा असल्याची चर्चा आहे.



हेही वाचा

विधानपरिषदेच्या जागेसाठी लॉबिंग सुरू, रामदास कदमांच्या नावाची चर्चा

१ ऑगस्टनंतरच महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा विस्तार होणार

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा