Advertisement

वंचितने हिंदुत्व स्वीकारलं का? प्रकाश आंबेडकर म्हणाले…

राज्यातील सर्व धार्मिक स्थळं सुरू करण्यात यावीत, या मागणीसाठी पंढरपुरातील विठ्ठल मंदिरासमोर वंचित बहजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली हजारो वारकऱ्यांनी आंदोलन केलं.

वंचितने हिंदुत्व स्वीकारलं का? प्रकाश आंबेडकर म्हणाले…
SHARES

राज्यातील सर्व धार्मिक स्थळं सुरू करण्यात यावीत, या मागणीसाठी पंढरपुरातील विठ्ठल मंदिरासमोर वंचित बहजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली हजारो वारकऱ्यांनी आंदोलन केलं. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून आठवड्याभरात धार्मिक स्थळं सुरू करण्यात येतील, असं आश्वासन मिळाल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आल्याचं वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. (VBA chief prakash ambedkar called off protest after cm uddhav thackeray promise to reopen all Religious places in maharashtra)  

आंदोलन मागे घेतल्यावर प्रकाश आंबेडकर यांनी मंदिरत जाऊन विठ्ठलाचं दर्शन घेतलं. यावेळी १५ जणांना त्यांच्यासोबत जाण्याची परवानगी देण्यात आली. विठ्ठलाचं दर्शन घेऊन आल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले की, विठ्ठ्लाच्या भाविकांना पंढरपूरला यायचं आहे. विठोबाचं दर्शन घ्यायचं आहे. मात्र सरकारच्या नियमांमुळे त्यांना येणं शक्य होत नाही. म्हणूनच आम्ही प्रार्थनास्थळं उघडण्याची भूमिका घेत आंदोलन केलं.

राज्यभरातील मंदिर, मशिद, बुद्ध विहार इ. धार्मिक स्थळं लवकरच सुरु करण्यात येतील, असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. त्यासाठी सरकार नियमावली तयार करत असून नियमावली तयार होण्यास ८ दिवस लागतील असं सांगण्यात आलं आहे. परंतु ८ दिवस उलटूनही जर यासंदर्भातील आदेश आला नाही, तर पुन्हा आंदोलन करण्यात येईल. त्यामुळे सरकारने लोकभावनेचा आदर करून पुन्हा या प्रश्नावर लढायला लावू नये, अशी अपेक्षा प्रकाश आंबेडकर यांनी केली. 

हेही वाचा - २ सप्टेंबरपासून मशिदी उघडणारच, इम्तियाज जलिल यांचं ठाकरे सरकारला आव्हान

कोरोनाच्या आजारातून ८५ टक्के रूग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे या आजाराला घाबरण्याची गरज नसून केवळ काळजी घेणं महत्त्वाचं आहे. आंदोलनासाठी जमलेल्या लोकांनी नियम मोडल्याचं म्हटलं जात आहे. परंतु नियम मोडण्यासाठीच आम्ही हे आंदोलन केलं आहे. सार्वजनिक वाहतुकीसोबतच दैनंदिन व्यवहार आता सुरू झाले पाहिजेत. लोकांच्या मनातील भीती दूर झाली पाहिजे, हाच या आंदोलनामागचा उद्देश असल्याचं कोरोनाच्या प्रादुर्भावाबद्दल बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.

त्यातच मंदिरं खुली करण्याचा मुद्दा हाती घेऊन वंचितनं हिंदुत्व पकडलं का?, असा प्रश्न विचारला असता, आम्ही महात्मा फुले, महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर यांना गुरू मानतो. या तिघांनी कधीही धर्म नाकारला नाही. धर्म हा समाजाचा अविभाज्य अंग आहे, अशीच त्यांची भावना होती. आम्ही त्यांच्या विचारांनुसार चालतो. कोणी कोणाला मानायचं, याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. इतर कोणतीही व्यक्ती ते लादू शकत नाही, असं उत्तर प्रकाश आंबेडकर यांनी दिलं. 

हेही वाचा - दारूची दुकानं उघडायला जेवढा उत्साह दाखवला, त्याच्या अर्धा उत्साह तरी मंदिरं उघडायला दाखवा- देवेंद्र फडणवीस

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा