Advertisement

Reservation: भाजप वा काँग्रेसमध्ये राजकीय आरक्षण बंद करण्याची हिंमत नाही- प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत अनुसुचीत जाती-अनुसुचीत जमातीला देण्यात येणारं राजकीय आरक्षण रद्द करून टाकण्याची मोठी मागणी केली आहे.

Reservation: भाजप वा काँग्रेसमध्ये राजकीय आरक्षण बंद करण्याची हिंमत नाही- प्रकाश आंबेडकर
SHARES

भारतीय संविधानाचे शिल्पकार डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू तसंच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत अनुसुचीत जाती-अनुसुचीत जमातीला देण्यात येणारं राजकीय आरक्षण रद्द करून टाकण्याची मोठी मागणी केली आहे. एवढंच नाही, तर बरेच जणं भलेही राजकीय आरक्षण रद्द करण्याची मागणी (vba chief prakash ambedkar demands to cancel political reservation in india) करत असले, तरी भाजप किंवा काँग्रेस पक्षात हे आरक्षण रद्द करण्याची हिंमत नाही, असंही आंबेडकर म्हणाले. 

मध्य प्रदेशातील पोटनिवडणुकीत वंचित बहुजन आघाडीतर्फे उमेदवार उभे करण्यात येणार आहेत. या निमित्ताने भोपाळमध्ये आलेले असताना प्रकाश आंबेडकर यांनी हे वक्तव्य केलं आहे. 

आरक्षणाची चुकीची व्याख्या

संविधानातील तरतूदीनुसार अनुसूचित जाती आणि जमातीला केवळ १० वर्षांसाठीच आरक्षण देण्यात आलं होतं, याकडे प्रकाश आंबेडकर यांचं प्रसारमाध्यमांनी लक्ष वेधलं असता ते म्हणाले की, संविधानाबाबतचं तुमचं हे अज्ञान असून त्यातूनच आरक्षणाबाबतची ही अत्यंत चुकीची व्याख्या केली जाते. लोकसभा आणि विधानसभेत अनुसूचित जाती आणि जमातीला राजकीय प्रतिनिधीत्व मिळावं म्हणून १० वर्षांच्या आरक्षणाची तरतूद करण्यात आली होती. त्यातही या आरक्षणाची गरज नसेल, तेव्हा हे आरक्षण रद्द करता येईल, असं म्हणत डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनीच स्वत: १९५४ मध्ये ही तरतूद काढून टाकण्याची मागणी केली होती, अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली.

हेही वाचा- Maratha Reservation: मराठा आरक्षण स्थगितीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार- अशोक चव्हाण

सत्ता जाण्याची भीती

संविधानाने दिलेल्या मतदानाचा अधिकार आता नागरिक वापरू लागले आहेत. मतदार संघ आरक्षित असो वा अनारक्षित, मतदार मतदान करू लागले आहेत. त्याअर्थाने संविधानाचा हा हेतू सफल झाला आहे. अनेकजण राजकीय आरक्षण रद्द करण्याच्या गोष्टी करतात. परंतु भाजप असो किंवा काँग्रेस व्होट बँकेचं राजकारण किंवा सत्ता जाण्याच्या भीतीने त्यांच्यात हे आरक्षण रद्द करण्याची हिंमत नाही, असं प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं. 

नोकरी, शिक्षणात गरज

याउलट नोकरी आणि शैक्षणिक आरक्षण मात्र असायला हवं. संविधानाच्या अनुच्छेद १६ नुसार नोकरी आणि शैक्षणिक आरक्षणाला मुलभूत अधिकार मानलं गेलं आहे. जोपर्यंत हा मुलभूत अधिकार असेल तोपर्यंत हे आरक्षण सुरू राहील, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

मी कधीच राजकीय आरक्षणाचा लाभ घेतला नाही. मी राखीव नसलेल्या जागेवरून निवडून आलो आहे, असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी स्वत:चं उदाहरण दिलं.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा