शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या पत्नी अनघा मनोहर जोशी यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आहे. रविवारी रात्री ११ वाजता दादर शिवाजी पार्क येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या ७५ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती मनोहर जोशी, पुत्र उन्मेष जोशी, अस्मिता आणि नम्रता या दोन कन्या, जावई गिरीश व्यास असा परिवार आहे.
अनघा जोशी यांचा जन्म २ जानेवारी १९४५ रोजी झाला होता. अनघा जोशी यांचं माहेरचं नाव मंगल हिगवे होतं. १४ मे १९६४ रोजी त्यांचा मनोहर जोशी यांच्याशी विवाह झाला होता. मनोहर जोशी यांच्या सामाजिक आणि राजकीय जीवनातील यशात अनघा जोशी यांनी त्यांना मोलाची साथ दिली.
लग्नानंतर मनोहर जोशी राजकारणात सक्रिय झाले. त्यांच्या राजकीय आणि सामाजिक कार्यातील चढ-उतार आणि यश-अपयशाच्या काळातही त्यांनी जोशी यांना खंबीर साथ दिली. मुंबई महापालिकेचे नगरसेवक, महापौर, विधान परिषदेचे सदस्य, आमदार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, खासदार, केंद्रीय अवजड उद्योग मंत्री, लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सदस्य या मनोहर जोशी यांच्या राजकीय प्रवासात अनघा यांनी त्यांना मोलाची साथ दिली.