दाऊद-महाजन कनेक्शनची चौकशी होणार?

Mumbai
दाऊद-महाजन कनेक्शनची चौकशी होणार?
दाऊद-महाजन कनेक्शनची चौकशी होणार?
See all
मुंबई  -  

कुख्यात आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिम याच्या नातेवाईकाच्या लग्न समारंभाला राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि भाजपाचे तीन आमदार उपस्थित राहणे ही अतिशय धक्कादायक बाब असून, या सर्वांची उच्चस्तरीय चौकशी होणे आवश्यक आहे. एकनाथ खडसेंना वेगळा न्याय तर गिरीश महाजन यांना वेगळा न्याय कशासाठी? असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी उपस्थित केला आहे.

ज्या लग्नसमारंभाला भाजपाचे नेते उपस्थित राहिले ते दाऊद इब्राहिमच्या अत्यंत जवळच्या नात्यातील आहेत. दाऊद इब्राहिम हा कुख्यात दहशतवादी असून, 1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटात त्याचा हात होता हे स्पष्ट आहे. या लग्न सोहळ्याला भाजपा नेत्यांबरोबरच अनेक पोलीस अधिकारीही उपस्थित असणे, ही देखील धक्कादायक बाब आहे. यातून दाऊदचे हितसंबंध किती खोलवर रुजलेले आहेत, हे दिसून येते. या लग्न समारंभाला उपस्थित पोलीस अधिकाऱ्याची नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी चौकशी सुरू केली असून, याचबरोबर आयबीचीही चौकशी सुरू असल्याचे समजते. यातूनच या विषयाचे गांभीर्य लक्षात येते. आयबीची चौकशी सुरू होणे याचा अर्थ सदर दाऊदचे नातेवाईक हे आयबीच्या रडारवर आहेत, हे स्पष्ट आहे. त्याच्या पुढे जाऊन सदर नातेवाईक हा बेटिंगच्या व्यवसायात पुढे असून, या समारोहाला अंडरवर्ल्डमधले अनेक गुंड, बुकी, उपस्थित होते, असा संशय आहे. राज्यातील ज्येष्ठ मंत्र्यांना आणि पालकमंत्र्यांना याची माहिती नसणे ही शक्यता दुरापास्त आहे. त्याचबरोबर स्थानिक भाजपा आमदारांना तरी याची माहिती निश्चित असावी असे सांगता येईल. त्यामुळे दाऊदच्या परिवाराशी आणि त्याच्याशी संबंधित कारवायांशी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचा काय संबंध आहे? हे स्पष्ट होणे गरजेचे असल्याचे सांगत सावंत यांनी भाजपावर जोरदार टीका केली.

याअगोदर भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यावर दाऊदशी फोनवर संभाषण झाल्याचे आरोप झाले होते. त्यांचा राजीनामा घेण्यामागे असलेल्या अनेक कारणांमागे हेही एक कारण होते. त्यामुळे एकनाथ खडसे यांना एक न्याय आणि मुख्यमंत्र्यांच्या जवळचे असल्याने गिरीश महाजन यांना दुसरा न्याय का? असा सवाल सचिन सावंत यांनी उपस्थित केला आहे.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.