'कामगारांची एकजूट आवश्यक'

 Parel
'कामगारांची एकजूट आवश्यक'

परळ - आजच्या 21 व्या शतकात जातीपातीचे राजकारण घडत आहे. मात्र शेतकरी अथवा हातावरचे पोट असलेल्या कामगार वर्गाच्या हितचिंतनाचा विचार कुणीही करताना दिसत नाही. मात्र ग. द. आंबेकर, एस. ए. डांगे, पीटर अल्वारिस, पी. डीमेलो, ना. म. जोशी आदी कामगार नेत्यांनी कामगार चळवळ आणि त्याचा इतिहास घडवण्यासाठी जो लढा उभा केला तो मोलाचे योगदान देणारा होता. त्यामुळे आजची कामगार चळवळ देखील त्याच मार्गाने आणि कामगारांच्या एकजुटीने ठेवल्यास कोणताही लढा अशक्य नाही, असं मत युवक बिरादरीचे संस्थापक संचालक पद्मश्री क्रांती शहा यांनी व्यक्त केलं. 

परळ पूर्व येथील राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने सोमवारी महात्मा गांधी सभागृहात आयोजित केलेल्या कामगार महर्षीं स्व. गं. द. आंबेकर जीवनगौरव आणि श्रमगौरव पुरस्कार सोहळ्यानिमित्त ते उपस्थित होते. या वेळी माजी राज्यमंत्री मुंबई राष्ट्रवादी अध्यक्ष सचिन अहिर, सरचिटणीस गोविंदराव मोहिते, उपाध्यक्ष बजरंग चव्हाण, खजिनदार निवृत्ती देसाई आणि उपाध्यक्ष अण्णा शिर्सेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यात कामगार चळवळीतील प्रतिष्ठेचा समजला जाणारा कामगार महर्षी गं. द. आंबेकर जीवनगौरव पुरस्कार इंटकचे ज्येष्ठ रेल्वे कामगार नेते राजेंद्र प्रसाद भटनागर यांना प्रदान करण्यात आला. तर श्रमगौरव पुरस्कारासाठी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या अशा 5 सत्कारमूर्तींची निवड करण्यात अाली.

Loading Comments