महापौरपदाच्या रांगेत पुन्हा यशवंत जाधव

  Mumbai
  महापौरपदाच्या रांगेत पुन्हा यशवंत जाधव
  मुंबई  -  

  मुंबई - मुंबईच्या महापौरपदाची निवडणूक येत्या ९ मार्च रोजी होणार असून या महापौरपदी आता कोण बसणार याची उत्सुकता सर्वांनाच लागलेली आहे. शिवसेना आणि भाजपामध्ये महापालिकेतील सत्तेसाठी रस्सीखेच सुरु आहे. परंतु दोन्ही पक्षांकडून महापौरपदासाठी इच्छुक उमेदवारांनी आपापल्या नावाची सेटींग लावण्यास सुरुवात केली आहे. महापालिकेत सध्या तरी शिवसेनेची सत्ता येण्याची चिन्हे आहेत. जर, शिवसेनेची सत्ता आल्यास यशवंत जाधव यांना महापौरपदाची लॉटरी लागेल का असा प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे.

  महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे 84, भाजपाचे 82, मनसेचे 7, राष्ट्रवादी काँग्रेसचे 9, काँग्रेसचे 31, अभासेचे 1, एआयएमआयएम 2, अपक्ष 5 नगरसेवक निवडून आले आहेत. पाचपैंकी चार नगरसेवकांनी शिवसेनेला पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या सत्तेची गणित जुळू लागली असून आता यशोधर फणसे, तृष्णा विश्वासराव यांचे पत्ते गळाल्यानंतर तब्बल दोन वेळा महापौरपदाची हुलकावणी देणाऱ्या यशवंत जाधव यांचे नाव पुन्हा एकदा आघाडीवर आहे. जाधव यांच्याबरोबरच आशिष चेंबूरकर, मंगेश सातमकर, रमेश कोरगावकर यांचीही नावे जोरदार चर्चेत आहे. परंतु पुरुषांऐवजी या खुल्या प्रवर्गातून महिला नगरसेवकाला महापौरपदी बसवण्याचा विचार झाल्यास माजी महापौर विशाखा राऊत, राजुल पटेल, शुभदा गुडेकर, किशोर पेडणेकर यांचीही नावे चर्चेत आहेत.

  जाधव यांचे स्वप्न पूर्ण होणार का ?

  महापौरपद हे 2002 मध्ये अनूसुचित जातीसाठी आरक्षित असताना त्यावेळी शिवसेनेचे महादेव देवळे आणि यशवंत जाधव यांची नावे चर्चेत होती. परंतु ऐनवेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी देवळे यांना महापौरपद बहाल केले. त्यानंतर मागील महापौरपदाची लॉटरी ही अनुसूचित जाती महिलासाठी राखीव होती. त्यावेळीही यशवंत जाधव यांच्या पत्नी यामिनी, स्नेहल आंबेकर आणि भारती बावदाने यांची नावे चर्चेत होती. पण प्रत्यक्षात स्नेहल आंबेकर यांचे नाव पुढे आले आणि यामिनी जाधवचा पत्ता कापला गेला. परंतु आता पुन्हा एकदा यशवंत जाधव यांना महापौर बनण्याची संधी चालून आली आहे.

  शिवसेनेची कशी असेल रणनिती

  यशवंत जाधव, सातमकर, कोरगावकर यांच्यापैकी एकाला महापौरपदी बसवल्यास सभागृहनेतेपदी विशाखा राऊत किंवा राजुल पटेल यांची वर्णी लागली जाण्याची शक्यता आहे. तर, स्थायी समिती अध्यक्षपदासाठी रमेश कोरगावकर आणि मंगेश सातमकर यांच्यामध्येही स्पर्धा आहे.

  काँग्रेसच्या गटनेतेपदी आसिफ झकेरिया, रवीराजा?

  काँग्रेसचे एकूण 31 नगरसेवक निवडून आले असून त्यांच्या पक्षाच्या गटनेतेपदी आसिफ झकेरिया आणि रवीराजा यांच्यामध्ये स्पर्धा आहे. तर, भाजपाच्या गटनेतेपदी मनोज कोटक, राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी कप्तान मलिकची वर्णी तर मनसेचे गटनेतेपदी दिलीप लांडे यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.