Advertisement

आदित्य विधानसभा लढवण्याचे संकेत, मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर राहणार नजर

युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांना निवडणुकीच्या आखाड्यात उतरवण्याचे संकेतही पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी दिले आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही आदित्य विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागल्याचं सांगितलं.

आदित्य विधानसभा लढवण्याचे संकेत, मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर राहणार नजर
SHARES

महाराष्ट्रातील पुढचा मुख्यमंत्री भाजपाचाच असेल, या भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या वक्तव्याने खवळलेल्या शिवसेनेने ५०-५० फाॅर्म्युल्यानुसार मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीसाठी रणनिती आखायला सुरूवात केली आहे. त्यासाठी युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांना निवडणुकीच्या आखाड्यात उतरवण्याचे संकेतही पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी दिले आहेत. 

मतदारसंघाची चाचपणी

आदित्य यांनी मंगळवारी वरळी आणि माहीम विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची अर्धा तास बैठक घेऊन मुंबईतील समस्यांवर तसंच नवीन मतदारनोंदणीवर लक्ष केंद्रीत करण्याचे निर्देश दिले. या बैठकीला उद्योगमंत्री सुभाष देसाई, माहीमचे आमदार सदा सरवणकर आणि वरळीचे आमदार सुनील शिंदे उपस्थित होते. बैठकीला येण्याआधी आदित्य यांनी युवासेना पदाधिकाऱ्यांना लोकसभा निवडणुकीतील मतांचा तपशील घेऊन येण्यास सांगितलं होतं. बैठकीनंतर विधानसभा निवडणूक लढवणार का? असा प्रश्न प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारताच अंतिम निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा असेल, असं सूचक वक्तव्यही त्यांनी केलं. 

उपमुख्यमंत्रीपद छोटं

तर, शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही आदित्य विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागल्याचं सांगितलं. परंतु ते निवडणूक लढवतील की नाही, हे उद्धव ठाकरेच ठरवतील, असंही स्पष्ट केलं. मुख्यमंत्री पदाच्या बाबतीत बोलताना राऊत म्हणाले की, मुख्यमंत्रीपद अडीच-अडीच वर्षे वाटून घेण्याच्या फाॅर्म्युल्यानुसार आदित्य नेतृत्व करण्यास सज्ज आहेत. परंतु उपमुख्यमंत्रीपद मात्र त्यांच्यासाठी तुलनेनं छोटं ठरेल.  

जागांसाठी खेचाखेच

लोकसभा निवडणुकीआधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांच्यात झालेल्या समझोत्यानुसार दोन्ही पक्ष विधानसभेच्या २८८ जागांपैकी निम्म्या जागा (शिवसेना १४४, भाजापा १४४) लढवतील असं ठरलं हाेतं. परंतु चंद्रकांत पाटील यांनी २८८ जागांपैकी १३५ जागा शिवसेना, १३५ जागा भाजपा आणि १४ जागा मित्रपक्ष लढवतील, असं परस्पर जाहीर केल्याने शिवसेनेत नाराजी पसरली. 

हा नवा फाॅर्म्युला अमान्य असेलल्या शिवसेना पक्षप्रमुखांनी यासंबंधी थेट शहा यांच्याशीच बोलणी करायचं ठरवलं. परंतु पुढचा मुख्यमंत्री भाजपाचाच असेल, या त्यांच्या वक्तव्याने आगीत तेल ओतलं गेलं. 

अडीच वर्षांचा फाॅर्म्युला

त्यातच युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी राज्यात शिवसेना-भाजपाचं सरकार आल्यास दोन्ही पक्षाचा मुख्यमंत्री अडीच-अडीच वर्षे राहील, असं ट्विट केल्याने मुख्यमंत्रीपदाच्या चर्चांना उधाण आलं.

राज्यात शिवसेनेचे आतापर्यंत २ मुख्यमंत्री झाले आहेत. युती सरकारच्या काळात शिवसेनेचे मनोहर जोशी १९९५ ते १९९९ पर्यंत मुख्यमंत्री होते. त्यानंतर नारायण राणे फेब्रुवारी १९९९ ते आॅक्टोबर १९९९ पर्यंत मुख्यमंत्रीपदावर कार्यरत होते. 

 


हेही वाचा-

भाजपाच्या नव्या फाॅर्म्युल्याने शिवसेना नाराज?

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार १४ जूनला?Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement